पिंपरणे परिसरात काल सोमवारी (दि.८) दुपारी दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जवळपास दोन तास सुरू असलेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पाहावयास मिळाले.
तालुक्यात शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पावसाअभावी खरीप हंगाम वाया जातोय की काय, असे चित्र निर्माण झाले होते. तर शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहात होते.
मात्र काल सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली होती. जवळपास दोन तास सुरू असलेल्या दमदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. तर शेतांना सुद्धा तळ्याचे स्वरूप आले होते.
त्यामुळे या दमदार पावसाने खरीप पिकांना चांगलेच जीवदान मिळाले आहे. दरम्यान, पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तरी तालुक्यात अद्यापही काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहवयास मिळत आहे.