Ahilyanagar Crime: संगमनेर- एका 27 वर्षीय युवकाची इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अकोले येथील बाप-लेकांनी आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, तब्बल 77 लाख 56 हजार 720 रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फेब्रुवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत हा प्रकार घडला. या फसवणुकीमुळे स्थानिक व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
तरूणाचा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान
फिर्यादी प्रसाद धनंजय रहाणे (वय 26, रा. रहाणे मळा, गुंजाळवाडी) यांनी अशोक बन्सीलाल भळगट, पुष्पक अशोक भळगट आणि नीलेश अशोक भळगट (रा. अकोले बसस्थानकासमोर) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. रहाणे यांचे गुंजाळवाडी येथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीचे दुकान होते आणि त्यांच्याकडे एका नामांकित इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती कंपनीची संपूर्ण जिल्ह्यासाठी डिस्ट्रिब्यूटरशिप होती. या व्यवसायात त्यांनी काही वर्षांत चांगली प्रतिष्ठा मिळवली होती. 2021 मध्ये अशोक भळगट यांनी रहाणे यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर दोघांमध्ये व्यवहार सुरू झाले.

आरोपींवर ठेवला विश्वास
सुरुवातीला, 2021 ते 2022 या कालावधीत अशोक भळगट आणि त्यांची मुले पुष्पक आणि नीलेश यांनी रहाणे यांच्याकडून नियमितपणे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली. या व्यवहारांदरम्यान भळगट कुटुंबाने वेळेवर पैसे देऊन रहाणे यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे रहाणे यांनी त्यांना मोठ्या प्रमाणात माल पुरवठा करण्यास सुरुवात केली. 2022 मध्ये भळगट यांनी मालाची मागणी लक्षणीयरीत्या वाढवली. रहाणे यांनी अधिक मालाची मागणी का, याबाबत विचारणा केली असता, भळगट यांनी त्यांचे ग्राहक वाढल्याचे कारण सांगितले. या विश्वासावर आधारित रहाणे यांनी त्यांना पाहिजे तितका माल पुरवला.
पोलिसांत ३ जणांविरोधात गुन्हा दाखल
फेब्रुवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत भळगट यांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली, परंतु त्यांनी यापैकी बहुतांश मालाची रक्कम अदा केली नाही. रहाणे यांनी वारंवार पैसे मागितले असता, भळगट यांनी लवकरच पैसे देण्याचे आश्वासन दिले. मात्र, कालांतराने पैसे मिळत नसल्याचे लक्षात येताच रहाणे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी भळगट कुटुंबाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात 77 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.