१९ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : श्रद्धा व सबुरीचा आशीर्वाद देणाऱ्या साईबाबांचे देशासह विदेशात देखील मोठ्या प्रमाणात भक्त आहेत.त्यामुळे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी रोज मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल होतात.मात्र अनेकदा त्यांना वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते.असेच दर्शन घेण्यासाठी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंगडम या देशातील भाविकांची पूजा साहित्याच्या नावाखाली फसवणूक करण्याचा आरोप असलेल्या चार आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याच बरोबर पोलिसांनी ज्या दुकानात भाविकांची फसवणूक झाली, त्याच्या जागा मालकाला सुद्धा आरोपी केले आहे.दुकान चालकाला या पूर्वीच आरोपी करण्यात आले आहे.भाविकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना प्रथमच पोलिस कोठडी मिळाल्याने भाविकांची पिळवणूक व लुबाडणूक करणाऱ्यांचे ढाबे दणाणले आहेत.

मूळचे पंजाबचे असलेले आणि सध्या यूकेमध्ये वास्तव्यास असलेले बलदेव राम यांचे कुटुंब शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते.दर्शनासाठी मंदिरात जात असताना एका एजंटने त्यांना एका दुकानात नेऊन ५०० रुपयांचे पूजा साहित्य ४ हजार रुपयांना विकत घेण्यास भाग पाडले.यानंतर भाविकांना आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्यासह पोलिस ठाण्यात जाऊन त्या व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी पोलिसांनी योगेश मेहेत्रे, अरुण त्रिभुवन, प्रदीप त्रिभुवन आणि सूरज नरवडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना राहाता न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.या शिवाय पोलिसांनी जागा मालक अनिल आढाव यालाही आरोपी केले आहे.
पोलिसांच्या ठोस भूमिकेने भाविकांना लुबाडणारांचे धाबे दणाणले आहेत.शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे हे सुद्धा अनधिकृत दुकानावर कारवाई करण्याच्या पावित्र्यात आहेत.साईभक्तांना लुबाडणूक प्रकरणी आरोपींना पोलिस कोठडी मिळाल्याची व दुकान भाड्याने देणाऱ्या जागा मालकालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे.विशेष म्हणजे सर्वपक्षीय ग्रामस्थ पोलिसांच्या समर्थनात आहेत.जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी तर शिर्डीला सुरळीत करण्याचा चंगच बांधला आहे.