दोन आमदार असूनही रुग्णांची हेळसांड ! दवाखानाच सलाईनवर एक महिन्यापासून डॉक्टरच नाहीत…

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : जामखेड शहरात शासनाच्यावतीने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मोठा खर्च करून हिंदुहसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून डॉक्टरच नसल्याने सध्या तरी हा दवाखाना सलाईनवर आहे. परीणामी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.

ग्रामीण तसेच शहरीभागातील गोरगरीब रूग्णांना आरोग्य सेवा मिळावी. यासाठी आपला दवाखाना ही संकल्पना आमलात आली त्याठिकाणी प्राथमिक मोफत उपचार मिळत आसल्याने त्याचा लाभ रूग्णांना मिळु लागला.

परंतु या दवाखान्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी रुग्ण करत आहेत. कारण हा दवाखाना दुपारी दोन वाजता सुरू होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांना त्याची सेवा मिळत नाही.

जामखेड शहरातील एका दिव्यांग बांधवाला उपचारासाठी प्रहारचे तालुका अध्यक्ष नय्युम शेख हे आपला दवाखाना या ठिकाणी घेऊन गेले असता त्याठिकाणी कोणीही डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नव्हते.

दुरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी बोलताना शेख म्हणाले की शासनाने आपला दवाखाना म्हणून गाजावाजा करत फक्त बोर्ड लावले जाहिरातीसाठी मोठा खर्च केला.

परंतु प्रत्यक्षात येथे कसलीही सुविधा सद्या स्थितीत मिळत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने ताबडतोब रूग्णसेवा सुरळीत करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

येथील एका डॉक्टरांनी राजीनामा दिला असल्याने गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी नवीन डॉक्टर उपलब्ध होऊ शकले नाहीत. वरीष्ठ कार्यालयाकडे डॉक्टर मिळावेत यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या दवाखान्याची वेळ ही २ ते रात्री १० वाजेपर्यंत आहे. त्यामुळे सकाळी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होते.

जामखेड तालुक्याला दोन आमदार असूनही अनेक समस्यांना सर्वसामान्य नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामध्ये येथील आपला दवाखान्यात गेल्या एक महिन्यापासून डॉक्टर नाही आशा अनेक प्रकारच्या सुविधांचा तुडवडा निर्माण झाला आहे. तरी दोन्ही आमदारांनी या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe