राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथे दि. २ ऑगस्ट २०२४ रोजी कपाशीच्या शेतात चाँद आंबीर पठाण या ४५ वर्षीय ट्रॅक्टर चालकाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावरकरवी करत अखेर तीन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की या घटनेतील मयत चाँद आंबीर पठाण हे राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथे राहातात. गावठाण येथील तनपुरे यांच्या विट भट्टीवर ट्रॅक्टरचालक म्हणून ते काम करीत होते. दि. २ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते त्यांचा मुलगा शकील यांना कपाशीच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र पिंगळे, सहाय्यक फौजदार तुळशीराम गिते, हवालदार सुरज गायकवाड, संदिप ठाणगे, नदीम शेख, संदीप बडे, चालक उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. तोपर्यंत पोलीस पथकाने संशयित तीन आरोपींना ताब्यात घेतले होते.
शवविच्छेदनानंतर चाँद पठाण यांच्या नातेवाईकांनी अंत्ययात्रा थेट पोलिस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होऊन चाँद पठाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे नगर येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
शकिल चाँद पठाण (रा. तांदुळवाडी, ता. राहुरी) यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात वैष्णवी अनिल गायकवाड, अनिल गायकवाड (रा. तांदुळवाडी, ता. राहुरी) तसेच बजरंग बर्डे (रा. पिंप्री अवघड, ता. राहुरी) या तिघांवर भारतीय न्याय संहिता कलम १०८, २३८, ३ (५), ३५१ (२) नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप परदेशी करीत आहेत.