अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- स्वच्छ सर्वेक्षण 2021 यामध्ये नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषदेस स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्वच्छ शहर व कचरा मुक्त शहर असे दोन मानांकन मिळाले आहे.
याबाबतची माहिती केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या संयुक्त सचिव व अभियान संचालिका रूपा मिश्रा यांनी या पुरस्काराबाबत पत्राद्वारे कळविले असल्याची माहिती नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिली.
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाकडून स्वच्छ सर्वेक्षण 2021 घेण्यात आले होते. त्याचा पुरस्कार सोहळा 20 नोव्हेंबर रोजी विज्ञान भवन, दिल्ली येथे होणार आहे.
या सर्वेक्षणामध्ये देशातील 4242 शहरांनी भाग घेतला होता. महाराष्ट्रातील महानगर पालिका, नगरपरिषद व नगरपंचायती असलेल्या अशा 22 शहरांना पारितोषिके मिळाले आहेत.
मानांकन/पुरस्कार वितरण सोहळा येत्या 20 नोव्हेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते व गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाचे मंत्री हरदीपसिंग पुरी आणि स्वच्छ भारत मिशनच्या सचिव रूपा मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले.
दरवर्षी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाकडून संपूर्ण भारतभर स्वच्छ सर्वेक्षण राबविले जाते. यामध्ये शहरात असलेले नागरिकांसाठी स्वच्छतेच्या सुखसोयी शौचालये, मुतार्या व इतर सुविधा,
सांडपाणी गटारी, विलगीकरणासह कचरा संकलन, वाहतूक, पुन्हा विलगीकरण तपासणी, त्यावर प्रक्रिया, हागणदारी मुक्त शहर मानांकन प्रशस्तिपत्रक, नागरिकांचा सहभाग असे अनेक कागदपत्रांच्या पूर्ततेसह उपलब्ध असलेल्या सुविधांवर आधारित या वेगवेगळ्या विषयावर गुणांचे विभाजन केलेले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम