Ahmednagar News : भगवानगड पाणी योजना व राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत आमदार मोनिका राजळे यांचे योगदान आपल्या एवढेच आहे. स्व. बाळासाहेब विखे, स्व. गोपीनाथ मुंडे व स्व. राजीव राजळे यांचा विकासकामांचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत.
कोणी काय केले, काय करीत आहे, काय करू शकते व कोणामध्ये दानत आहे, याची जाण जनतेला उत्तम आहे. मतपेटीतून ती व्यक्त होईलच, असे मत खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील येळी येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. मोनिका राजळे, भगवानगड पाणी योजनेचे अध्यक्ष संजय बडे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, भाजप तालुका अध्यक्ष माणिक खेडकर,
येळेश्वर संस्थानचे महंत रामगिरी महाराज, सरपंच शुभांगी जगताप, महादेव जायभाय, काशीबाई गोल्हार आदी उपस्थित होते. पाणी योजनेचे अध्यक्ष संजय बडे यांचा कामाच्या यशस्वीतेबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या वेळी आ. राजळे म्हणाल्या, गेल्या दहा वर्षांत येळी गावाला सर्वाधिक विकास निधी मिळाला. येथील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी पाठपुरावा करत विकास कामांसाठी एकत्र आल्याने विकास कामाची गती वाढली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करताना गावाने एकत्र येत लोकसहभागातूनही जलसंधारण, नदी खोलीकरणाची वैशिष्ट्यपूर्ण कामे केली. त्याचा परिणाम स्वरूप तालुक्यातील सर्वात संपन्न गाव म्हणून येळीची ओळख आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांसह खासदार डॉ. सुजय विखे यांचे मोलाचे योगदान विकास निधीसाठी लाभते. विरोधकांकडून होत असलेल्या टिकेबाबत लवकरच आपण उत्तर देऊ, असे राजळे म्हणाल्या.
दि.२२ तारखेला प्रभू रामचंद्राच्या जन्मावेळी दुपारी बारानंतर दोन लाडू प्रसाद स्वरुपात देऊन देवापुढील लाडू एकत्रित करून प्रसाद स्वरुपात शाळेतील मुलांना वितरित करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रास्ताविक संजय बडे तर आभार दत्तात्रय बडे यांनी मानले.