३ फेब्रुवारी २०२५ हातगाव : गेल्या अनेक वर्षांपासून ठाकूरनिमगाव गावाने राजळे कुटुंबावर प्रेम केले असून, त्या बदल्यात मी गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देऊन गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींबरोबरच महायुती शासनाने केलेल्या विविध विकास कामांमुळेच जनतेची मोठी साथ मिळाली.यापुढेही गावच्या विकासासाठी निधी देण्याचा माझा प्रयत्न राहील,अशी ग्वाही आ. मोनिका राजळे यांनी दिली.
आ. मोनिका राजळे यांची विधानसभेवर तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल तर राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन अन्न सुरक्षा अधिकारी (राजपात्रित) निवड झालेली गावातील पहिली महिला अधिकारी प्राजक्ता आंबादास बडे ह्या युवतीचा एकत्र सन्मान सोहळा शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने नुकताच पार पडला.
या वेळी सत्काराला उत्तर देताना प्राजक्ता बडे यांनी सांगितले की, कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर विद्यार्थ्यांनी अगोदर जिद्दी असणे गरजेचे आहे. मला आई वडिलांनी मोठी साथ दिल्यामुळेच आज मी या पदापर्यंत पोहचले आहे माझ्याप्रमाणेच गावातील इतरही मुलींनी अभ्यासात मग्न राहून उच्च पदापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.
सरपंच संजय खेडकर म्हणाले की,आपल्या गावाला आ. राजळेंच्या रुपाने मोठा निधी प्राप्त झाला आहे, त्यामुळे विकासकामे करणाऱ्यांसोबत आमचे गाव खंबीरपणे उभे राहील. या वेळी ह.भ.प. अशोक महाराज, सविता ढाकणे, प्रांजल गुठे, वाल्मिक गुठे, यांनीही विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास सुरेश नेमाणे, अशोक गुठे, अशोक खेडकर, अंबादास बडे, विठ्ठल खेडकर, संपत खेडकर, भगवान गोरे, केशव आंधळे, शरद चाबुकस्वार, संतोष खेडकर, बाळासाहेब डोंगरे, नवनाथ भवर, अप्पा ढाकणे, कंठाळे गुरुजी, संदीप सोनवणे, धर्मराज गोयकर, सुनील ढाकणे, नामदेव वाल्हेकर, चांगदेव गोयकर, चंदू घुले व ग्रामस्थ उपस्थित होते.