नगर महापालिका आरोग्य सेवांच्या रँकिंगमध्ये राज्यात शेवटच्या पाच पालिकांमध्ये, आयुक्तांकडून गंभीर दखल !

Ahmednagarlive24 office
Published:
mahanagarpalika

शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने राज्यातील सर्व मनपाचे आरोग्य कार्यक्रमातील निर्देशकांवर आधारित रैंकिंग केले आहे. यात नगर महापालिकेचा शेवटच्या पाच मनपात (क्रमांक २४) समावेश झाला आहे.

याची गंभीर दखल घेत आयुक्त यशवंत डांगे यांनी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना नोटीस वजा पत्र पाठवून आरोग्य विभागाच्या असमाधानकारक कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच, कामकाजात सुधारणा करून पहिल्या ५ महापालिकांमध्ये क्रमांक आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील शेवटच्या ५ महापालिकांमध्ये नगरचा समावेश झालेला आहे. ही बाब मनपास भूषणावह नाही.

जून महिन्याच्या रैंकिंगमध्ये लसीकरण, माता आरोग्य, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्य, आरसीएच पोर्टल, एनटीईपी एमओएच, एनएलईपी एमओएच, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, आशा कार्यक्रम या व इतर कार्यक्रमात कमी गुण मिळाले आहेत.

या कार्यक्रमांकडे अधिक लक्ष देऊन कामामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे, असे आयुक्तांनी म्हटले आहे. १५ ऑगस्टपर्यंत शहरामध्ये ८ आरोग्यवर्धिनी केंद्रे चालू करुन नागरी सुविधा देणे आवश्यक आहे. या उपक्रमाच्या कामातही प्रगती नाही.

शहरामध्ये डेंग्यू, साथीचे आजार वाढत आहेत. यामुळे कुठलीही गंभीर स्वरूपाची घटना घडून महापालिकेची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपले कामकाज हे दुर्लक्षपणाचे आहे. त्यामुळे आपल्या कामकाजामध्ये सुधारणा करावी, अशा सूचना आयुक्त डांगे यांनी दिल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe