Ahmednagar News : चालू वर्षी मुबलक पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सरासरीच्या ११० टक्क्यांहून अधिक पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत. यात सोयाबीन, तूर, मका, कांदा या पिकांसह दक्षिण जिल्ह्यात कडधान्य असणाऱ्या मूग, उडिद, मटकी आणि कपाशी लागवडीसह अन्य पिकांचा समावेश आहे.
मात्र, गेल्या १० ते १५ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून संततधार पावसाने पिके रोगाला बळी पडत आहेत. काही ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचल्याने वाढ खुंटली असून, येथील शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत.
सततच्या या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांवर मोठ्या प्रमाणात किड रोगाचा प्रार्दुभाव झालेला आहे. यात पाने खाणाऱ्या अळी आणि मका पिकावर पडलेल्या लष्करी अळीने हल्ला केल्याचे दिसत आहे.
यंदा मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर झाल्यानंतर जून महिन्यात पावसाच्या हलक्या सरी येत राहिल्या. या कमी- जास्त प्रमाणात पावसाच्या हलक्या सरीवर शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने खरिपाची पेरणी केली. यंदा जवळपास ७ लाख हेक्टरपर्यंत खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या झालेल्या असून काही ठिकाणी उशीर झालेल्या पेरण्या संपत आलेल्या आहेत.
चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी महागडी खते, बियाण्यांवर मोठा खर्च करत पेरणी केली. यात कापूस, मूग, उडीद, तुरीसोबत सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी येत, ढगाळ वातावरणामुळे बियाणे उगवलेही.
परंतु, नंतर पाऊस तसा कमी-जास्त प्रमाणात दिवसांपासून ढगाळ वातावरण अथवा हलक्या पावसामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा हल्ला झाल्याचे दिसत आहे.
यामुळे शेतकरी आता किटकनाशकांच्या फवारणीत व्यस्त दिसत आहे. जिल्ह्यात सध्या सोयाबीन, मका पीक जोमात आहे. परंतु लष्करी आणि पाने खाणाऱ्या आळीमुळे ते कोमात गेल्याचे दिसून येत आहे. खते, औषध व बियाणे मोठ्या प्रमाणात महाग झाली आहेत.
त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आहेत, मका काढणीनंतर मका आणि सोयाबीनला भाव चांगला मिळाला तर स्थिती सुधारणार असून अन्यथा पुन्हा आर्थिक संकट घोंगावणार आहे.