साईभक्तांची गैरसोय ! शिर्डी हैदराबाद बस कोपरगाव डेपोने केली अचानक बंद

शिर्डी-हैदराबाद बससेवा अचानक करण्यात आली बंद. डेपोच्या निर्णयामुळे साईभक्तांची गैरसोय झाली आहे

Published on -

अहिल्यानगर – शिर्डी ते हैदराबाद दरम्यानची एसटी महामंडळाची एकमेव बससेवा (Shirdi Hyderabad Bus) कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आली. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या साईभक्तांची व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागल्याने प्रवाशांना आता जादा भाडे मोजावे लागत आहे.

सेवा बंद

ही स्लीपर कोच बससेवा कोपरगाव डेपोअंतर्गत सुरू होती. काही दिवसांपूर्वी या मार्गावर धावणारी बस नादुरुस्त झाल्याने काही प्रवाशांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, एसटी महामंडळाने बस दुरुस्त करण्याऐवजी थेट संपूर्ण सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.परंतु, पर्यायी बसची सोय न करता अचानक सेवा बंद केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. एसटीने केवळ दुरुस्तीसाठी बस काही दिवस थांबवण्याऐवजी संपूर्ण सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे, हा अन्यायकारक निर्णय असल्याचे प्रवाशांचे मत आहे.

एकमेव बससेवा

शिर्डीला दरवर्षी दक्षिण भारतातील लाखो साईभक्त दर्शनासाठी येतात. त्याचप्रमाणे, शिर्डीहून हैदराबादकडे प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. कोपरगाव डेपो अंतर्गत सुरू असलेली ही एकमेव सेवा दररोज सायंकाळी ५ वाजता शिर्डीहून निघत असे. अहिल्यानगरमध्ये साडेसात वाजेपर्यंत पोहोचून, पुढे प्रवास करत दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत हैदराबाद येथे पोहोचत असे.

या मार्गासाठी दोन बसगाड्या नेमण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या तीन दिवसांपूर्वी एक बस नादुरुस्त झाल्यानंतर प्रवाशांनी तक्रारी केल्या होत्या. यावर पर्यायी बस उपलब्ध करून देण्याऐवजी, महामंडळाच्या राज्य कार्यालयाकडून कोपरगाव विभागाला सेवा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.

प्रवाशांमध्ये नाराजी

या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे. मराठवाडा मित्र मंडळाने एसटी प्रशासनाला त्वरित ही सेवा सुरू करण्याची मागणी केली असून, अन्यथा तारकपूर एसटी स्थानकाचे गेटबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

नादुरुस्त बस दुरुस्त करणे किंवा पर्यायी बस उपलब्ध करणे शक्य होते. मात्र, थेट सेवा बंद करून प्रवाशांची व साईभक्तांची गैरसोय केली गेली आहे. या निर्णयाचा फेरविचार करून एसटीने सेवा त्वरित पूर्ववत करावी अन्यथा शनिवार (५ एप्रिल) रोजी आंदोलन छेडले जाईल.

साईभक्तांना आर्थिक भुर्दंड

या मार्गावरील एसटीच्या बससेवेचे भाडे सुमारे ₹१३०० होते. ही बस स्लीपर कोचसह सर्व सोयींनी सुसज्ज होती. एसटी सेवा बंद झाल्याने प्रवाशांना आता खासगी बससेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. सिझनप्रमाणे या मार्गावरील खासगी बसेस ₹१५०० ते ₹१७०० भाडे आकारत आहेत.

परिणामी सर्वसामान्य प्रवासी आणि साईभक्तांना मोठ्या आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागत आहे, एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी त्वरित सेवा पूर्ववत करावी, अन्यथा एसटी प्रशासनाविरोधात मोठे जनआंदोलन उभारले जाईल, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe