Ahmednagar news : मी सातत्याने सत्य बोलत असतो. धर्मासाठी सत्य बोलले पाहिजे. दहा वर्षापूर्वी मी जे बोललो ते आता खरे झाले आहे. श्रावण महिन्यात महिनाभर उपवास करणाऱ्यांची मला किव येते. एवढे उपवास करून शरीराला त्रास का करून घेता? कर्म हिच खरी पूजा आहे. हिंडून फिरून देव भेटत नसतो. सावता महाराजांना त्यांच्या मळ्यात देवाने दर्शन दिले. असे मत निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील गणेश मित्र मंडळाच्यावतीने आयोजित वाघाई माता प्रांगणात झालेल्या कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी इंदोरीकर महाराज म्हणाले, मी नेहमी सत्य बोलतो, कोणीतरी खरे बोलले पाहिजे, परंतु माझ्या बोलण्याचा उलटा अर्थ लावला जातो. त्यामुळे सत्य बोलल्याने मी अनेकदा अडचणीत येतो.
यावेळी त्यांनी पैठण आणि त्रंबकेश्वरचे महत्त्व विषद करत प्रवरासंगम बाबत माहिती दिली. वारकरी संप्रदायात एकच जात आहे, ती म्हणजे माणूस, ८० टक्के लोकांना बापाची संपत्ती सांभाळता येत नाही.
सध्या व्यसनांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. प्रत्येक गावात जवळपास ९१ टक्के तरुण दारू पितात. लाचार समाज निर्माण झाला की, कमी बुद्धीची माणसं राज्य करतात. समाजाच नेतृत्व सुधारलं की समाज सुधारतो. शिकलेल्या युवकांची वाईट अवस्था समाजातील नेतृत्वानेच केली.
सध्याचे अनेक कीर्तनकार पुढाऱ्यांचे कौतुक करतात. कौतुक करणाऱ्यांचा सन्मान होतो. नारायणगिरी महाराज म्हणजे चालतं बोलतं ब्रह्म होते, असेही त्यांनी सांगितले.
व्यसनामुळे तरुण मुलांचा मृत्यू होत आहे, इंदोरीकर महाराजानी त्यांच्या ओघवत्या शैलीत विविध विषयांवर भाष्य करत अप्रत्यक्षपणे अनेकांना चिमटे काढले. हास्याच्या फवाऱ्यातून समाजप्रबोधनाचे पाठ गिरविले.
गावागावांत राजकारणात चढाओढ चालते. वादविवाद होतात. गावागावांतील एकोपा टिकवून ठेवा असे आवाहन यावेळी महाराजांनी केले. किर्तनासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी त्यांनी गणेश मित्र मंडळाच्यावतीने इतर खर्च टाळून समाजप्रबोधनाचे काम हाती घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच आज याच गोष्टीची गरज असल्याचे मत व्यक्त केले.