इंदोरीकर कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवत आहेत; तृप्ती देसाई यांची कारवाईची मागणी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्याविरोधात खटला दाखल झाला होता.

अशातच कोरोना बाबतीत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर वाद निर्माण झाला आहे. इंदोरीकरांनी कीर्तनामार्फत अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे.

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच, असे वक्तव्य कीर्तनकार इंदोरीकर हे कीर्तनात करत आहे. अशाप्रकारे कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न केला असून, देसाई यांनी आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

पुढे बोलताना देसाई म्हणाल्या की, कोरोनामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहे, तर अनेक जण मृत्यूच्या दारातून बाहेर आले आहेत. तसेच करोना ही महाभयंकर महामारी असून, सध्या तिसरी लाट येत आहे.

यामुळे नागरिक घाबरून गेले आहेत. एकीकडे सरकार जनजागृती करण्याच काम करत असून, दुसरीकडे इंदुरीकर अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करत आहेत. यासंबंधी इंदुरीकरांवर कारवाई करा, अन्यथा सरकारचे प्रतिनिधीसुद्धा अंधश्रद्धा पसरविण्यात सामील आहे असे जनतेला वाटेल, असे देसाई यांनी म्हटले आहे.

राज्यात निवडणुका जवळ आल्या असून, इंदोरीकर यांना अनेक ठिकाणी सरकारमधील नेते आणि विरोधी पक्षातील नेते यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना बोलविले जाते.

त्या ठिकाणी गर्दी जमा होते. म्हणूनच दरवेळी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न या सर्व नेत्यांकडून केला जातो. यापूर्वीसुद्धा इंदुरीकर यांच्या करोनावरील वक्तव्यावर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही.

हिंमत असेल तर आणि आपल्या राज्यात सर्वांना कायदा समान असेल तर सरकारने इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करावा. अन्यथा अंधश्रद्धा पसरवण्यात सरकारसुद्धा सहभागी आहे असे जनतेला वाटेल, असेही देसाई यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe