IndusInd Bank चे बनावट क्रेडिट कार्ड तयार करून फसवणूक करणारी टोळी जेरबंद करण्यामध्ये राहुरी पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुरी पोलीस ठाण्यात टाकळीमिया येथील किरण बाजीराव चिंधे यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
त्यामध्ये आरोपीने फिर्यादीचा मोबाईल क्रमांक व पॅन कार्डवरील माहिती वापरून इंडसंट बँकेचे क्रेडिट कार्ड मिळवले होते. त्याद्वारे एकूण ८३ हजार रुपयांचा अपहार केल्याचे म्हटले होते. या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नवाब ऊर्फ सोनू हबीब सय्यद (वय ३०, धंदा बँक फायनान्स, रा. महादेव वाडी, ता. राहुरी, असलम ऊर्फ भैय्या चांद पठाण (रा. राहुरी), कारभारी देवराम गुंड (वय २८, रा. महादेव मंदिराशेजारी, कुक्कडवेढे, राहुरी, हल्ली मुक्काम प्लॉट नंबर १४७, गावटेनगर, घुलेनगर, मांजरी बुदूक, ता. जि. पुणे) अशी आरोपांची नावे असून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपीकडे अधिक विचारपूस केली असता आरोपींनी सांगितले, की एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड व पॅन कार्ड प्राप्त केल्यानंतर त्यावरील माहिती मोबाईलमधील एप्लीकेशनच्या माध्यमातून बदलण्यात येते.
पुणे येथील साथीदारांशी ऑनलाईन व फोनवरून ओळख करून देऊन बनावट आधार कार्डवरील पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल बनवून त्याद्वारे कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड प्राप्त करून क्रेडिट कार्डवरून पैसे काढले.
त्यामुळे ज्याच्या नावाने क्रेडिट कार्ड काढलेले आहे, त्याला या गोष्टीचा कुठलाही थांगपत्ता नसतो; परंतु तो जेव्हा बँकेत लोन काढण्यासाठी जातो, त्यावेळी त्याला त्याचे सिबील खराब झालेले असल्याचे समजते.
अशा प्रकारे बर्याच लोकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड वापरून त्यांच्या नावाने क्रेडिट कार्ड तयार करून फसवणूक करण्यात आली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सर्वसामान्य नागरिकांनी बँकांच्या अधिकृत कर्मचार््यांशिवाय दुसर्यांकडे आधार, पॅन कार्ड देऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.
ही कारवाई ‘पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक बसवराज शिवपूजे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक चारूदत्त खोंडे,
कर्मचारी विकास साळवे, सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रविण बागुल, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, शिरसाठ, सचिन ताजणे, गणेश लिपणे, सम्राट गायकवाड, अमोल गायकवाड, सचिन धनाड, संतोष दरेकर, अशोक शिदे, अजिनाथ पाखरे, शकुर सय्यद यांनी केली.