पाटपाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी कोलमडले आहे. त्यामुळेच आज लाभक्षेत्राला पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. तसेच लाभक्षेत्रात व धरणाच्या पाणलोटात अद्यापही पुरेसा पाऊस नसल्यामुळे नजीकच्या काळात पाणी टंचाईची समस्या भासणार आहे.
त्यास पाटबंधारे विभागाचे अधिकारीच कारणीभूत असतील, असा आरोप बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे व खजिनदार सुनिल मुथा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात खंडागळे व मुथा यांनी पाटबंधारे विभागाचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे की, भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. तसेच निळवंडेचेही पाणी उपलब्ध होते. असे असताना आधिकाऱ्यांनी नियोजनात निष्काळजीपणा व बेफिकीरी दाखविली.
मुबलक पाणी उपलब्ध आहे. या भ्रमात राहून वाटेल, तसे मनमानी नियोजन केले. वास्तविक योग्य नियोजन झाले असते, तर जुलै अखेरीपर्यंत पाणीटंचाई उद्भवली नसती. पण हिवाळ्यात एक आवर्तन अनावश्यक घेतले गेले.
तसेच प्रवरा नदीपात्रातील बंधाऱ्यात काही प्रमाणात पाणी असताना मार्च-एप्रिल महिन्यातील आवर्तनातून चार फळ्यांपर्यंत बंधारे भरुन दिले असते, तरी नदीकाठचा प्रश्न मिटला असता. पण तसे न करता बंधारे भरुन ओव्हरफ्लो होवून पाणी मध्यमेश्वर बंधाऱ्याच्या खाली नदीपात्रात वाया गेले. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याची टिका त्यांनी केली.
निवडणूका आल्या की नेत्यांच्या दबावामुळे गरज नसताना फक्त मतांचा हिशोब डोळ्यासमोर ठेवून अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो. खरे तर अधिकाऱ्यांनी दबावास बळी न पडता वस्तुस्थिती व भविष्यातील संभाव्य धोके नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजेत.
तसे होत नाही आणि गरज नसताना पाणी वापरल्याने ऐन उन्हाळ्यात गरज असताना पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. याकडे लक्ष वेधले आहे. जुलै अखेरपर्यंत पाणी पुरेल अशा तन्हेने नियोजन करणे अपेक्षित आहे. त्यात आता निळवंडेच्या पाण्यास मुकावे लागणार असल्याने भंडारदरा धरणाच्या ११ टि.एम.सी. पाण्यावरच विसंबून राहावे लागणार असल्याने तर खूपच काटकसरीचे नियोजन करावे लागणार आहे.
त्यात समान्यायी पाणी वाटप कायद्याचेही आव्हान असल्याने तर पाण्याचा अपव्यय टाळावा लागणार आहे. तेव्हा अधिकाऱ्यांनी यापुढे जुलै महिना ग्राह्य धरुन भंडारदरा धरणातील पाण्याचे तंतोतंत नियोजन करावे. तसेच कालव्यावरील लाभक्षेत्र व नदीपात्रातील बंधाऱ्यांचे लाभधारकांना समान न्याय द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.