१० मार्च २०२५ चिचोंडी पाटील: ग्रामीण भागातील अनेक तरूणांचे विवाह रखडलेले आहेत. त्याचसोबत अनेकजण आर्थिक विवंचनेत आहेत. नेमका याच संधीचा पुरेपुर फायदा घेत नगर तालुक्यात धर्मांतर करणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. यांच्याकडून अशा तरूणांना त्याचा विवाह लावून देण्यासह आर्थिक मदत देण्याचे आश्वसन देत धर्मांतर करण्यास भाग पाडत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
नगर तालुका तसा दुष्काळीच त्यामुळे उत्पनाचे साधनं कमी प्रमाणात असल्याने नागरिकांचे आर्थीक उत्पन्न कमीच आहे. एकंदरीत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी, शेतमजुर अथवा शहरात काम करणे यावरच अनेकांची उपजिवीका चालते.मागील काही वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांच्या तसेच नोकरी नसणाऱ्या अनेक मुलांचे विवाह रखडलेले आहेत. त्यातील अनेक जणांनी लग्न जमवणाऱ्या एजंटमार्फत लग्न उरकले मात्र त्यातही काहींची फसवणूक झाली.

त्यामुळे पैसेही गेले अन् नवरीही पळाली हाती उरला केवळ पश्चाताप अशी अवस्था त्यांची झालेली आहे. या संधीचा फायदा घेत काही धर्मांतर करणारे लोक तालुक्यात फिरत आहेत. हे लोक गावागावात जात अशा अडचणीत असलेल्या तसेच अशीक्षित नागरिकांची सर्व माहिती घेतात. नंतर त्यंची भेट घेवून तुम्हाला काही लाखात आर्थीक मदत मिळवून देवू, तसेच पुढील काळात तुमच्या दवाखान्याचा देखील खर्च आम्ही करू असे आमिष दाखवले जाते.
तसेच वाढते वय, दररोज जीवन जगताना होणारी ओढातान यामुळे वैतागलेले तरूण गाठून त्यांना देखील जर तुम्ही धर्मांतर केले तर या टोळ्या तुमचे लग्न आम्ही करतो, तसेच या बदल्यात तुम्हाला रोख पैसे मिळतील, तसेच पुढील काळात मुलांचे शिक्षण, आरोग्याचा सर्व खर्च उचलण्याचे आश्वासन दिले जाते. त्यामुळे अशा आश्वासनांना अशिक्षीत कुटुंबे तसेच रोजच्या कटकटीला वैतागलेले अनेक सुशिक्षीत तरूण देखील बळी पडत आहेत.
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावात देखील असाच प्रकार सुरू होता. मात्र याबाबत नागरिकांना कुणकुण लागताच त्यांनी तिकडे जात संबंधितांना चांगलीच समज दिली. मात्र असे प्रकार वारंवार घडत असताना याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी संबंधित विभागाने अशा प्रकारांवर आळा घालणे गरजेचे असून या टोळ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
अनेक वर्षांपासून टोळी सक्रिय या टोळीमध्येपुरुषासह महिला देखील अनेक वर्षापासून तालुक्यातील गावांमध्ये फिरतात. सुरूवातीला एका हॉस्पिटलसाठी देणगी मागतात तसेच गरजू व्यक्तींना किंवा तरुण मुलांना धर्मांतर विषय आमीष दाखवून धर्मांतर करण्यास प्रवृत्त करण्यास भाग पाडतात.
प्रत्येकाला त्यांच्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचा हक्क आहे. मात्र, हिंदू धर्मातील गरीब व वंचित कुटुंबांना खोटे आमिष दाखवून जबरदस्तीने धर्मातर करण्याचे प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारच्या गैरकृत्यांवर जशाच तसे उत्तर दिले जाईल. तसेच, या प्रकारांना सहकार्य करणाऱ्या गावातील लोकांनी सावध राहावे, अन्यथा यापुढे त्यांची नावे जाहीर केली जातील. हिंदू समाजाने अशीच एकजूट दाखवत अशा कुटील कृत्यांना थांबविणे गरजेचे आहे.- मनोज कोकाटे, मा. तालुकाध्यक्ष, भाजपा नगर तालुका