अहमदनगर जिल्ह्यात सध्या राजकारणाचे वारे उलटेच फिरू लागले आहे. कोण कोणासोबत फिरतोय व कोण कोणाला शह देतोय हे लोकांना समजेनासे झाले आहे. लोकांना सध्या बुद्धिभ्रम सुरु असल्यासारखं वाटत आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर विखेंविरोधात भाजपमधीलच विखेंविरोधक एकत्र यायला सुरवात झाली आहे.
निमित्त होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. नीलेश लंके यांचे फराळ कार्यक्रम. हा कार्यक्रम जरी राष्ट्रवादीचा असाल तरी येथे भाजपचेच लोक दिसले. विशेष म्हणजे ते विखे विरोधक होते.
या कार्यक्रमात भाजपचे आ. राम शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, सुवेंद्र गांधी आदींसह भाजप नेत्यांची मांदियाळी दिसली. या कार्यक्रमात विखे विरोधक एकवटले असल्याचे दिसले. कुणी नाव घेत नसले तरी त्यांचा वळण्याचा ओघ कुणीकडे होता हे सर्वानाच माहिती आहे.
मी छोटा नाही पालकमंत्री आहे : आ. शिंदे
फराळ कार्यक्रमात बोलताना आ. राम शिंदे म्हणाले, लंके यांच्या फराळाचा शेवट करायला आलो असून सुरूवात आपणच करू व शेवटही आपणच करू. कोणत्याही कामाचे नेटके नियोजन करू शकतो, याचे महाराष्ट्रात एकमेव उदाहरण म्हणजे आ. नीलेश लंके हे आहेत असं गुणगान त्यांनी गायलं. लोकप्रतिनिधीकडून जनतेच्या खूप अपेक्षा असतात व त्या पूर्ण करण्याचे सामर्थ्य आ. लंके यांच्यात आहे असे ते म्हणाले.
आम्ही एकत्र आलो तर अनेक लोक चर्चा करतात की, हे कसे एकत्र आले? जसे दुसरे एकत्र आले तसेच आम्ही एकत्र आलोय. मी देखील छोटा नाही, माजी पालकमंत्री आहे. एकमेकांच्या दिवाळी फराळाला जाणेही संस्कृती आहे
त्यामुळे ज्याला कुणाला काय अर्थ काढायचा ते त्याने काढायचे असे आ. राम शिंदे म्हणाले. विखे यांचे विरोधक असणारे लंके हे भावी खासदारकीची दावेदार असतील असे म्हटले जात असताना शिंदे यांनी ज्या पद्धतीने लंके यांचे हे गुण गायले ते आता चर्चेचा विषय झाला आहे.
अहंकार्यांना घरी बसविण्यासाठी आ. लंके यांना साथ द्या : कोल्हे
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी देखील घणाघात केला. ते यावेळी बोलताना म्हणाले की, येथे आल्यावर आमचा सगळा थकवा निघून गेला. कोविड काळात मी आ. नीलेश लंके यांचे काम पाहिले असून या माणसाचा उपयोग महाराष्ट्रासाठी व्हायला पाहिजे असे ठरविले होते.
आज अहंकारी विचाराचे लोक खाली बसविण्यासाठी आ. लंके यांच्यासारख्या देव माणसासोबत सक्षमपणे उभे राहिले पाहिजे. नीलेश लंके ही एक व्यक्ती नाही. तो एक समूह आहे असे ते म्हणाले.