ती वाघनखे शिवरायांची नाहीतच, शिवप्रेमींची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप – इंद्रजित सावंत

Ahmednagarlive24 office
Published:
vaghanakhe

लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथे असणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांचीच आहेत, असा कोणताही पुरावा आमच्याकडे नसल्याची कबुली खुद्द व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिली आहे. मात्र जी वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, ती महाराजांचीच आहे असे भासवून शिवप्रेमींची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी सावंत म्हणाले, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथील विविध वाघ नखापैकी एक वाघनख तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर आणण्याचा सामंजस्य करार ३ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासन व व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांच्यात झाला.

यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा दावा केला. यासंदर्भात मी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांच्याकडून माहिती मागवली असता, त्यांनी १९ जून २०२४ रोजी पत्र पाठवून ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा कोणताही पुरावा म्युझियमकडे नसल्याचे सांगितले.

याची माहिती राज्य शासनाच्या प्रतिनिधींनाही दिल्याचे म्युझियमने सांगितले; पण ही माहिती जनतेपासून लपवून ठेवण्यात आली. या वाघनखांची प्रतिकृती महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची उधळपट्टी केली जात आहे.

मात्र ही वाघनखे शिवाजी महाराज यांची नाहीत. म्युझियममधील वाघनखे ही मूळ वाघनखांची प्रतिकृती असू शकते. मूळ वाघनखे ही सातारच्या छत्रपतींकडे कायम राहिली असल्याचे पुरावे सांगतात, असेही सावंत म्हणाले.

वाघनखे प्रकरणी सरकार उदासीन

ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांची नाहीत याचे ठोस पुरावे मी राज्य सरकारला दिले होते. सांस्कृतिक कार्यमंत्री, सांस्कृतिक कार्य विभाग सचिव आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व संचालनालयाचे तत्कालीन संचालक तेजस गर्ग यांना वारंवार पत्रव्यवहारातून सादर केले आहेत. मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवून याची माहिती दिली; पण या गंभीर विषयाबाबत सरकार उदासीन असल्याचे ते म्हणाले.

खरी वाघनखे सातारच्या छत्रपतींकडेच

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे ही मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहेत. ही वाघनखे सातारच्या छत्रपतींकडे कायम राहिली असल्याचे पुरावे सांगतात. महाराष्ट्राची अस्मिता या वाघनखांशी जोडली असल्याने लंडनमधील वाघनखांच्या प्रतिकृतीला छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे असल्याचे सांगून दिशाभूल केली जात आहे. पेशव्यांच्या कैदेतून सुटून सातारा राज्याची पुनर्स्थापना करणारे छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या विश्वासार्हतेलाच तडा पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय की काय, अशी शंका सावंत यांनी उपस्थित केली. यावेळी अमित अडसुळे उपस्थित होते.

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe