Ahmednagar News : धरणातील पाण्याचे रब्बीच्या आवर्तनाचे नियोजन जाहिर करावे. त्यासाठी शासनाने त्वरीत कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन रब्बीतील धरणातील पाण्याचे आवर्तने तसेच संभाव्य उन्हाळ्यातील आवर्तनाचे वेळापत्रक त्वरीत जाहिर करावे,
अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या माहितीनुसार, भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून शासनाने कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन रब्बीच्या आवर्तनाबाबत त्वरीत नियोजन जाहिर करणे गरजेचे आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या शेतीच्या मशागती रब्बी हंगामासाठी पूर्ण झालेल्या आहे. पिकाचे नियोजन करणेसाठी धरणातून रब्बीसाठी किती दिवसाचे अंतराने पाण्याचे आवर्तने होणार आहे, याची माहिती शेतकऱ्यांना झाली पाहिजे.
त्यातच समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे जायकवाडी धरणाला या दोन्ही धरणातून ३.३६ टी.एम.सी. पाणी देण्याबाबत लवादाचा निर्णय झाल्याचे समजते. त्यामुळे देखील शेतकरी हवालदिल झालेला आहे.
यापूर्वी भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनींना बारमाही पाणी मिळत असल्याने त्यांचे क्षेत्र बागायती धरुन पूर्वी सिलींग अॅक्टनुसार जमिनी काढून घेतल्या होत्या.
आता समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे बागायती क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे. एका बाजुला बारमाही पाणी मिळते म्हणून बागायत क्षेत्र धरुन शेतकऱ्यांच्या जमिनी काढल्या आणि आता समन्यायी पाणी वाटप कायद्याखाली पाणी बारमाही न देवून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.
त्यातच शेतकऱ्यांना वेळेवर पूर्ण क्षमतेने दिवसा वीज मिळत नाही. आणि शासन वेळेवर कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन आवर्तनाचे नियोजन जाहिर करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असल्याचे गुजर यांनी स्पष्ट केले आहे.