अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीरामपूर जिल्हा करावा, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, सबजेलसाठी जागा आरक्षित करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (९ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात आले.
गांधी पुतळ्यासमोर सर्वपक्षीय नेत्यांनी श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. श्रीरामपूर शहर पोलिसांनी आंदोलन करताना अटक करून सुटका करण्यात आली.
समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्रिभूवन म्हणाले, की पुढील पंचवार्षिक निवडणुकीत श्रीरामपूर आमदारकीचे आरक्षण उठवून ते आरक्षण राहात्याला जाणार आहे.
त्यामुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना हक्काचा मतदारसंघ राहणार नाही, म्हणून त्यांनी श्रीरामपूर जिल्हा करून त्यांच्यासाठी श्रीरामपूर मतदारसंघ सोयीचा, हक्काचा होईल. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदारही त्यांच्याच घरातला होईल, असे ते म्हणाले.
कार्याध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की श्रीरामपूरमध्ये सर्व सोयी असताना सरकारी कार्यालयासाठी सरकारी जागा भरपूर असताना बहुसंख्य लोकांची मागणी आहे श्रीरामपूर जिल्हा करावा सरकारने याची गंभीर दखल घेऊन श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घ्यावे लागेल.
सचिव राजेंद्र सोनवणे म्हणाले की भौगोलिक दृष्टिकोनातून श्रीरामपूरच जिल्हा होण्यास योग्य आहे. अशोक कानडे म्हणाले, की राजकीय बोटचेप्या धोरणांमुळे अडथळा निर्माण होत आहे.
श्रीरामपूर जिल्हा झाला तर मोठे उद्योगधंदे येऊन श्रीरामपूरला मोठा निधी उपलब्ध होऊन सर्वसामान्यांचा जनतेचा रोजी रोटीचा प्रश्न सुटेल. शिवसेनेचे संजय छलारे म्हणाले की श्रीरामपूर शहरांमधील नेत्यांनी श्रीरामपूरकराच्या जीवावरती राजकारण केले, पदे उपभोगले, त्यांनी श्रीरामपूर जिल्ह्याच्या आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेताना दिसत नाही ही शोकांतिका आहे.
मर्चेंट असोसिएशन अध्यक्ष सुनील गुप्ता म्हणाले की श्रीरामपूर जिल्ह्यासाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने जे जे आंदोलन हाती घेतील त्यांच्या आंदोलनाला आमचा कायम पाठिंबा राहील.
लहुजी सेनेचे बाळासाहेब बागुल, हनीफ पठाण, गौतम उपाध्ये, डॉ. संजय नवथर, पुरुषोत्तम झंवर, बाळासाहेब खावीया, संजय कासलीवाल, मुन्ना पठाण, रजाक पठाण, संजय साळवे, दीपक कदम, बाळासाहेब चांडोळे, मच्छिंद्र साळुंखे, संघराज त्रिभुवन, शुभम लोळगे, अशोक अभंग, दीपक माखिजा, संजय वाव्हाळ आदी उपस्थित होते.