Ahilyanagar News : राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द-चिंचोली जलजीवन योजना सातत्याने अडचणींचा सामना करत असल्याने योजनेचे भवितव्यच पाण्यात गेल्यासारखे वाटत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे ही योजना राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेची बळी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे
कोल्हार खुर्द-चिचोली संयुक्त पाणीपुरवठा योजना केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेतून मंजूर झाली होती. ‘हर घर जल’ हा या योजनेचा उद्देश होता; मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी राहिल्याने सुरुवातीपासूनच अडथळे निर्माण झाले. योजनेच्या प्रत्यक्ष राववणीत प्रशासनाच्या
चुकीच्या निर्णयांमुळे निर्णयांमुळे अधिकाऱ्यांच्या मर्जीमुळे तब्बल वर्षभर उशीर झाला चिचोलीपेक्षा कोल्हार खुर्दमध्ये या योजनेवर मोठ्या प्रमाणात राजकीय वाद उभे राहिले. योजनेत अनेक त्रुटी राहिल्यामुळे ती प्रभावीपणे राबवली गेली नाही.
संबंधित अधिकाऱ्यांनी गावातील पदाधिकाऱ्यांशी योग्य संवाद साधला नाही, ज्यामुळे आर्थिक अपप्रवृत्तीला वाव मिळाला. ग्रामस्थांनी आरोप केले की काही अधिकाऱ्यांनी आपले आर्थिक स्वार्थ जोपासले, ज्यामुळे काम बिघडले. कोल्हार खुर्द आणि चिंचोली गावातील ग्रामस्थांनी या योजनेबाबत सर्व राजकीय गटांनी एकत्र येऊन तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. पिण्याच्या पाण्याची होरपळ संपवण्यासाठी ग्रामस्थ आतुर आहेत
मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही योजना फक्त एक मृगजळ ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. कोल्हार खुर्द-चिचोली जलजीवन योजना पुन्हा रुळावर आणण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, या योजनेचे भविष्यच धोक्यात येण्याची शक्यता अधिकच बळावली आहे