जल जीवनच्या कामांची चौकशी करणार जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची ग्वाही

Published on -
जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची ग्वाही
खा. नीलेश लंके यांनी मंत्री पाटील यांची भेट
अहिल्यानगर : प्रतिनिधी
       केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या पाणी योजनांची कामे निकृष्ट झाली असून या कामांची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी खा. नीलेश लंके यांना दिली.
      जल जीवन मिशन अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या किंवा राबविण्यात आलेल्या पाणी योजनांच्या चौकशीच्या मागणीसाठी खा. लंके यांनी मंत्री पाटील यांची नवी दिल्लीत बुधवारी भेट घेतली. या भेटीमध्ये खा लंके यांनी मंत्री पाटील यांना झालेल्या भ्रष्टाचाराची त्यांना तपशिलवार माहीती दिली. हा प्रकार गंभीर असून त्याची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करू अशी ग्वाही पाटील यांनी खा. लंके यांना दिली.
      जल जीवन मिशन योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणी योजनांमधील भ्रष्टाचाराबाबत खा. लंके हे गेल्या काही महिन्यांपासून आवाज उठवत आहेत. संसदेतही त्यांनी हा प्रश्न उपस्थित करून केंद्रीय समितीमार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी केली होती. जल शक्ती मंत्री पाटील यांची यापूर्वीही भेट घेऊन खा. लंके यांनी या योजनेमधील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते.
      जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीतही खा. लंके यांनी पाणी योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर बोट ठेऊन भ्रष्टाचार झाला नसेल तर मी राजीनामा देतो अशी टोकाची भूमिका घेतली होती. खा. लंके हे या कामातील गैरप्रकार उघड करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असून आता केंद्रीय मंत्री चौकशी समितीची कधी घोषणा करतात याकडे लक्ष आहे.
▪️चौकट
निकृष्ट कामाच्या लेखी तक्रारी द्या
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्हयात राबविण्यात आलेल्या पाणी योजनांची कामे ज्या-ज्या गावांमध्ये निकृष्ट झाली आहेत. अशा सर्व गावांतील कामाच्या लेखी तक्रारी माझ्या नगर किंवा पारनेर येथील संपर्क कार्यालयात देण्यात याव्यात.
खासदार नीलेश लंके
लोकसभा सदस्य
▪️फोटो ओळ
खा. नीलेश लंके यांनी बुधवारी दिल्ली येथे जलशक्ती मंत्री सी. आर.पाटील यांची भेट घेत जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी योजनांमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe