अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाच्या पाण्याच्या टँकरवर राहणार ‘जलदूत’चे लक्ष

Published on -

अहिल्यानगर : सध्या जिल्ह्यासह राज्यभर टंचाईच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून टँकरची मागणी केली जात आहे. मात्र ऑफलाइन पद्धतीने टँकर मागणीचे हे प्रवास दाखल होत असल्याने त्यात मानवी हस्तक्षेप असतोच. या कामात कधी विलंब होतो. त्यामुळे जेथे गरज आहे त्या परिसरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकदा टँकरच्या कामकाजा संदर्भात आरोप-प्रत्यारोप देखील होतात.

मात्र आता टँकर मागणीच्या प्रवासातील विलंब टाळून या कामात अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने जलदूत ॲप विकसित केले आहे. या जलदूतमुळे टँकरचे प्रस्ताव, मंजुरी आणि पुढे संबंधित टँकर खेपांचा प्रवास ऑनलाइन असणार आहे. यामुळे विलंबाचा मनस्ताप टळेल व टँकर पाणी पुरवठ्यात अधिक पारदर्शकता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या निर्देशात या जलदूत एप्लीकेशन संदर्भात दि.११ मार्च व दि.१२ मार्च असे सलग दोन दिवस जिल्हास्तरीय प्रशिक्षण संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले. जलदूत ॲप्लीकेशन विकसित करणारे अभियंता प्रशांत नष्टे यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. मंगळवारी पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर, अकोले, संगमनेर या तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी, तहसीलदार, बीडीओ आणि संबंधित उपविभागीय अधिकारी सहभागी झाले. तर बुधवारी कर्जत, जामखेड, अहिल्यानगर, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, राहता या तालुक्यातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांचा प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला.

जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांच्या दिशेनिर्देशात निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, मदत- पुनर्वसन शाखा नायब तहसीलदार भारती घोरपडे, सहायक महसूल अधिकारी प्रवीण कांबळे, महसूल सहायक वनिता पेद्राम यांनी याकामी परिश्रम घेतले. राज्य शासनाच्या मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत या टंचाई कालखंडात जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणाऱ्या गाव-खेडी आणि वस्त्यांवरील नागरिकांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जाते. त्यासाठी गावपातळीवरून टँकर मागणीचे प्रस्ताव दाखल केले जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe