अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- नेत्रदान, अवयवदान सारख्या चळवळीत सक्रीयपणे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी गेल्या पस्तीस वर्षात 72 वेळा रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
बोरुडे यांचे फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु आहे.
गरजू व वंचित घटकातील रुग्णांसाठी मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदूशस्त्रक्रिया शिबीरसह विविध आरोग्य शिबीर घेऊन गरजूंना आधार देण्याचा त्यांचा अविरत प्रयत्न सुरु आहे. तर कोरोनाच्या संकटकाळात गरजूंना आधार देण्यासाठी त्यांनी विविध आरोग्य शिबीर देखील घेतले.
नुकतेच माळीवाडा येथे झालेल्या रक्तदान शिबीरात रक्तदान करुन त्यांनी विक्रमी रक्तदानाचा आकडा गाठला. अहमदनगर जिल्ह्याच्या सामाजिक चळवळीत जालिंदर बोरुडे यांनी मोठे योगदान दिले आहे. गरजू रुग्णांच्या रक्ताची गरज भागविण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेले रक्तदान प्रेरणादायी आहे.
रक्तदानासारखे पुण्याचे कार्य दुसरे कोणते नसून, रक्तदानाने एका गरजवंताला जीवदान दिल्याचे पुण्य मिळत असल्याची भावना माजी नगरसेवक अॅड. धनंजय जाधव यांनी व्यक्त केली.
यावेळी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी ही जालिंदर बोराडे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांनी युवकांसाठी प्रेरणादायी कार्य उभे केल्याचे सांगितले. दिपक खेडकर, बाबासाहेब पटवेकर, राजेंद्र एकाडे, गणेश बनकर, नितीन डागवाले आदिंसह युवक उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved