जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड: न्यायालयात सरकारी पक्षाचा युक्तीवाद पूर्ण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-   जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील संजय, जयश्री आणि त्यांचा मुलगा सुनील जाधव या तिघाची 2014 मध्ये हत्या झाली होती. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी या हत्याकांड खटल्यात पाच दिवस सरकारी पक्षाचा युक्तीवाद केला.

आरोपींच्या वतीने अ‍ॅड. जी. एस. मगरे हे 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान बचावाचा युक्तीवाद करणार आहेत. या खटल्यातील साक्षीदार, विविध पंचनामे, तज्ञ पंचांच्या साक्षी, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे अहवाल आदी पुराव्याच्या साखळी जोरकसपणे सरकारी पक्षाच्या वतीने मांडली.

या आधारे तिहेरी हत्याकांडास हेच आरोपी कारणीभूत असल्याचे अ‍ॅड. यादव यांनी युक्तीवादादरम्यान न्यायालयासमोर मांडले. यासाठी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे महत्वाचे न्यायनिवाड सादर केले. राज्यभर गाजलेल्या जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील तिहेरी हत्याकांडप्रकरणी येथील प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यर्लागड्डा यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.

सोमवारी सरकारी वकिल अ‍ॅड. यादव यांनी युक्तीवाद केला. केवळ भावाचा नव्हे तर बंधुत्वाच्या नात्याचा खून केला आहे. आरोपींनी खुनानंतर मृतदेहाचे तुकडे- तुकडे करून कौर्याची परीसिमा गाठली आहे, असा युक्तीवाद सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी न्यायालयासमोर केला.

या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, पाथर्डी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुभाष अनमलवार, पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेले विविध पंचनामे आणि गुन्ह्याशी असणारा थेट संबंध याबाबतचे विवेचन केले.

आरोपी प्रशांत, दिलीप आणि अशोक जाधव यांची मानसशास्त्रीय चाचणी गुजरात राज्यातील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत करण्यात आली होती. या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यापूर्वी ही चाचणी करण्यात आली आहे. या चाचण्याची स्वीकारहार्ता आणि त्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे 1961 ते 2010 पर्यंतचे महत्वाचे न्यायनिवाडे सादर केले.

या चाचण्यांमध्ये आरोपींच्या कथनकानुसार वेगवेगळ्या पंचनाम्याच्या अनुषंगाने आरोपींचे दोषीत्व दर्शविचार्‍या अनेक गोष्टी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. आरोपी प्रशांत याने मयताचा शोध घेताना विहिरीत शोध घेण्याचे सूचविले. मयत हे कोठे मंदिरात किंवा नातेवाईकांकडे गेले असतील, हे सूचविले नाही.

यावरून आरोपींना मयताचे मृतदेह कोठे टाकले आहेत, याचे ज्ञान होते. आरोपीच्या पायाला जखम झाली होती. परिचारिका सुनिता गर्जे यांनी त्यावर उपचार केले होते. आरोपीच्या घरातून जप्त करण्यात आलेले हत्यारे, मयतांच्या अंगावरील जखमासंदर्भात तज्ञ डॉ. ठुबे यांनी दिलेली साक्ष महत्वाची आहे.

अशोक जाधव याने कपडे हे रॉकेल ओतून जाळले होते. ते पंचासमक्ष उकांडा उचकून दाखविले होते. मयताचे काही कपडे गाठोड्यात बांधून फेकून दिले होते. हे गाठोडे पोलिसांनी मिळविले आहे. त्यामध्ये जयश्रीची साडी आढळून आली आहे. पुराव्याची साखळी न्यायालयासमोर सादर केली.

आरोपी दिलीप जाधव याने एका पंचनाम्यात मयताचे मृतदेह टाकलेली विहिर दाखविली होती. या पंचनाम्यान निशाणी क्रमांक देण्यात आलेला नव्हता. या पंचनाम्यान निशाणी क्रमांक देण्याची मागणी विशेष सरकार वकील यादव यांनी केली.

त्यास आरोपींचे वकील जी. एस. मगरे यांनी हरकत घेतली. त्यावर यादव यांनी गुजरात उच्च न्यायालयाचे महत्वाचा न्यायनिवाडा सादर केला. खटल्याचा निकाल लागेपर्यंत निशाणी क्रमांक देता येऊ शकतो, असे या न्यायनिवाड्यात नमूद केलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News