किरण काळेंच्या झंजावातामुळे बिथरलेल्या “त्यांचा” बदनाम करण्यासाठी जीवाचा आटापिटा !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar Politics :-  मनपा अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या टक्केवारीच्या भ्रष्ट कारभारामुळे नगर शहरामध्ये रस्ते नावाला सुद्धा उरलेले नाहीत.

बाजारपेठेसह शहराचा बहुतांशी भाग उध्वस्त झाला आहे. सर्वसामान्यांच्या या प्रश्नासंदर्भात शहरातील एकही पुढारी, पक्ष साधा ब्र सुध्दा काढायला तयार नसताना शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे या एकमेव निर्भीड नेतृत्वाने जनतेचा आवाज बनत भ्रष्ट लोकांना काँग्रेस पक्षाच्यावतीने जाहिरपणे घेरण्याचे काम केले आहे.

या झंझावातामुळे बिथरलेल्या “त्यांचा” आता काळेंना येनकेन प्रकारे बदनाम करण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरु असल्याचा आरोप, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांनी केला आहे.

बाजारपेठेतील रस्त्यांच्या प्रश्नावर व्यापाऱ्यांसह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तांची काल भेट घेतल्यानंतर सावेडी उपनगरातील सुरू असणार्‍या रस्त्याचा कामाची शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील आदींसह पाहणी केली.

त्यानंतर काल रात्री उशिरा अचानक सावेडीतील नगरसेविका पती तायगा शिंदे यांनी काळे यांनी रस्त्याच्या कामावर येत टक्केवारी मागितल्याचा आरोप केला.

त्या पार्श्वभूमीवर दशरथ शिंदे यांनी पत्रक काढत तायगा शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे म्हणाले की, तायगा शिंदे यांचे जरी शब्द असले तरी त्यांचा खरा बोलविता धनी कोण आहे हे सबंध शहराला माहिती आहे.

तायगा शिंदे यांनी आरोप करताना म्हटले की किरण काळे यांनी दारू पिऊन, बिंडा खाऊन नशेत माझ्या सारख्या जेष्ठ नगरसेवकाशी अरेरावी केली. गैरवर्तन केले.

नगरकरांना माहिती आहे की काळे यांना साध्या सुपारीचे देखील व्यसन नाही. त्यामुळे दारू पिणे, बिंडा खाणे या खूप दूरच्या गोष्टी आहेत. मुळात तायगा शिंदे हेच दारू पिऊन आरडाओरडा करत शिवराळ भाषेत बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

यातून शहराच्या चुकीच्या नेतृत्वामुळे नगर शहराच्या राजकारणाची पातळी किती खाली घसरली आहे हे नगरकरांना पाहायला मिळत आहे.

शहरातील स्वयंघोषित कार्यसम्राटाच्या आदेशावरून दिवंगत अनिलभैय्या राठोड यांच्यानंतर सामान्यांचा हक्कांसाठी आवाज उठणाऱ्या निर्भीड काळे यांना येनकेन प्रकारे बदनाम करण्यासाठी “त्यांचा” अहोरात्र आटापिटा सुरू आहे.

नगरकर जनता सुज्ञ आहे. त्यामुळे अशा गोष्टींना ते भीक घालत नाहीत. शिंदे म्हणाले की, तरुण, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत असणाऱ्या काळे यांच्या निर्भीड, पारदर्शक, अभ्यासू वृत्तीमुळे नगरकरांचे जरी भले होत असले तरी “त्यांच्या” प्रत्येक कामात टक्केवारी खात जनतेच्या पैशावर दरोडा टाकण्याच्या ईराद्यावर पाणी फेरले जात असल्याने “ते” पूर्णपणे बिथरले आहेत.

म्हणूनच आधी काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने खोट्या आयटी पार्कचा खरा भांडाफोड केल्यानंतर खोटा विनयभंग, खोटी ॲट्रॉसिटी, व्यापाऱ्यांवरील दहशतीच्या विरोधात काँग्रेसने आवाज उठवत संरक्षण दिल्यानंतर खोटा खंडणीचा आणि पोलिस स्टेशनमध्ये आपल्या पंटर लोकांना पुढे करतं काळे यांच्याविरोधात एकामागे एक खोट्यानाट्या केसेस दाखल करण्याची मालिका राबवित “त्यांनी” धडाका लावला आहे.

काळे यांना बदनाम करण्याच्या हेतूने रस्त्यांच्या कामांमध्ये ते टक्केवारी मागत असल्याचा खोटा आरोप केला असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe