Ahmednagar News : छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास समाजापुढे यावा यासाठी शौर्य जागरण यात्रेचे भव्य आयोजन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने केले आहे. राष्ट्रद्रोही प्रवृत्तीविरोधात लढा देण्यासाठी बजरंग दलात सामील व्हा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशात मोठे योगदान आहे.
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यापैकी एका संस्थेशी प्रत्येक हिंदूंनी जोडले गेले पाहिजे. जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आणि मरावे तर धर्मवीर संभाजी महाराजांसारखे. प्रत्येकाने हिंदू धर्मरक्षक म्हणून जगावे असे प्रतिपादन प्रखर हिंदुत्ववादी नेते तेलंगणाचे आमदार टी. राजासिंह ठाकूर यांनी केले आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या हिंदू साम्राज्य स्थापना वर्षानिमित्त ३० सप्टेंबर २०२३ पासून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आयोजित केलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचा समारोपाप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत ‘एक रात्र गडावरती’ हे नगरच्या ५० बालकलाकारांनी नाटक सादर केले.
याप्रसंगी प्रखर हिंदूत्ववादी नेते, तेलंगणाचे आमदार टी. राजासिंह ठाकूर बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय सहमंत्री वि. हिं. प. दादा वेदक, राजाभाऊ कोठारी, रा.स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, बजरंग दल प्रांत सह संयोजक नितीन महाजन, नगर विभाग मंत्री सुनील खिस्ती, जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, अध्यक्ष अँड.जय भोसले, डॉ. एकनाथ मुंडे, बजरंग दल जिल्हा संयोजक कुणाल भंडारी आदी उपस्थित होते.
यावेळी दादा वेदक म्हणाले, देशात धर्मांध प्रवृत्तीने खुले आव्हान दिले आहे. देशात धर्मांध शक्तीच्या विरोधात लढण्यासाठी सक्षम आहे. ज्या वेळेस देशावर संकट येते त्यावेळेस बजरंग दल उभे राहते.
देशातील ४४ प्रांतात छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनास साडेतीनशे वर्ष पूर्तीनिमित्त शौर्य जागरण यात्रा ३० सप्टेंबरपासून काढण्यात आली. एक लाख नवयुवक बजरंग दलाशी जोडले गेले पाहिजेत.
छत्रपती शिवरायांच्या आदर्श ठेवून गेली साठ वर्षापासून विश्व हिंदू परिषद बजरंग दल वाटचाल करीत असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमास नगरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील ख्रिस्ती यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले तर आभार कुणाल भंडारी यांनी मानले.