अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- कळसुबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्यात दुपारच्या सुमारास रानगव्याने स्थानिक युवकासह वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना दर्शन दिले.
घाटघर परिसरातील रहिवासी युवक विजय गांगड याने सर्वप्रथम गव्याला बघितले आणि तातडीने त्याच्याजवळील मोबाइलमध्ये छायाचित्रे टिपली. यावेळी वनरक्षक महेंद्र पाटील यांनाही वाटेत रानगव्याने दर्शन दिले.
दरम्यान कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यामध्ये पुन्हा रानगवा परतल्याने आनंदाचे वातावरण आहे. करोनाच्या पहिल्या लाटेच्या सुरुवातीला रानगव्याच्या हालचाली अभयारण्यात पाहावयास मिळत होत्या;
मात्र करोनापासून रानगवा गायब झाला होता. मात्र मंगळवारी संपूर्ण वाढ झालेला व अंदाजे तीन ते चार वर्षे वयाचा रानगवा (नर) घाटगर वनपरिमंडळातील जंगलात दिसला आहे. हा वन्यप्राणी कुठल्याही प्रकारे मनुष्यासाठी उपद्रवी नाही,
त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. रानगवा अभयारण्यात येणे हे शुभवर्तमान आहे. गवा कोणालाही दिसल्यास त्याला कुठलाही त्रास देऊ नये.असे प्रतिपादन सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी केले आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाच्या खबरदारीबाबत सूचना… रानगवा असल्याची खात्री पटल्यानंतर तत्काळ सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, अमोल आडे,
रवींद्र सोनार आदींनी स्थानिक गावकर्यांसह टेंट कॅम्पेनिंग करणार्या युवकांची बैठक बोलविली. बैठकीत रानगवा संवर्धनासह सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाच्या खबरदारीबाबत विविध सूचना रणदिवे यांनी दिल्या आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम