करंजी परिसर बनलायं संत्राचे आगार दिवसाला पाचशे टन माल मार्केटला; व्यापारातून तरुणांना मिळाला रोजगार

Mahesh Waghmare
Published:

करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजी, भोसे, दगडवाडी, वैजूबाभळगाव, घाटशिरस, जोडमोहज, लोहसर, खांडगाव, देवराई, या परिसरात मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबीच्या फळबागा आहेत. संत्र्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे दिवसभरात सुमारे पाचशे टन संत्रा या परिसरातून मार्केटला पाठवला जात असल्यामुळे या परिसराची ओळख संत्राचे आगार म्हणून होत आहे.

संत्रा – मोसंबीच्या व्यापारातून या परिसरातील तरुणांना एक चांगला रोजगारदेखील मिळाला आहे. बहुतांश सर्व तरुण शेतकऱ्यांचीच मुले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या. मालाला चांगला भाव मिळत आहे. यावर्षी संत्रा मोसंबीला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

करंजीपासून तिसगावपर्यंत संत्रा – मोसंबीच्या साठवणुकीसाठी मोठमोठे व्यापाऱ्यांनी भाडेतत्त्वावर घेतली आहेत. तर काही व्यापाऱ्यांनी मंगल कार्यालयाच भाडोत्री घेऊन त्या ठिकाणी संत्रा मोसंबीची छाटणी सुरू केली आहे. यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पाणी उपलब्ध आहे, त्यामुळे फळबागांना चांगला बार फुटला, यातून उत्पन्नातही वाढ झाली.

करंजी, तिसगाव परिसरात विलास टेमकर, शिवाजी वांढेकर, अंबादास टेमकर, अंबादास वारे, संदीप वारे, करंजीचे गजानन गायकवाड, चांगदेव गायकवाड, जालिंदर वामन, विवेक मोरे, सतीश क्षेत्रे, अझर पठाण, राजू गवळी, सुनील अकोलकर, बाळासाहेब अकोलकर,

बंडू मोरे, रणजीत अकोलकर, सचिन शिदोरे, सचिन अकोलकर, मायंजी भवार, बद्रीनाथ अकोलकर, राजू गायकवाड यांच्यासह अनेक तरुण जिद्दीने या व्यवसायात उतरले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांना चांगला भाव मिळत आहे. तर फळ तोडणीतून हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या हाताला काम मिळत आहे

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe