अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagar News :- केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
यासह विविध मागण्याबाबत समाधान झाल्याने कोतकर व ठुबे कुटुंबियांनी मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू केलेले उपोषण उपसभापती ना. डॉ. नीलम गोर्हे यांच्या मध्यस्थीने मागे घेतले आहे.
महापालिका पोटनिवडणुकीच्या काळात शिवसेनेचे पदाधिकारी वसंत ठुबे व संजय कोतकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे. यात विशेष सरकारी वकील म्हणून ना.डॉ. गोर्हे आणि सीआयडीच्या वतीने अँड. मिसर यांच्या नियुक्तीची मागणी झाली होती.
सध्या सीआयडीकडून तपास सुरू असताना यात पूर्वीच्या तपास अधिकार्यांनी काही चुकीचे शपथपत्र देण्यात आले असल्याचे कोतकर आणि ठुबे कुटुंबायांचे म्हणणे असून यासंदर्भात त्यांनी उपोषण केले होते.
याची माहीती मिळताच उपसभापती ना.डॉ.गोर्हे यांनी अप्पर मुख्य सचिव गृह विभाग यांची बैठक बोलावली. यात तात्काळ अँड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले.
तसेच यावेळी सीआयडी अधीक्षक श्रीकांत धावरे आणि तपास अधिकारी नारायण सस्ते यांना पुढील तपासबाबत योग्य काळजी घेण्याची सुचना केली. याचबरोबर पीडित कुटुंबियांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले.
तसेच यात कोणी अधिकार्यांनी दुर्लक्ष केले असेल त्यांच्यावर कार्यवाही करण्याची सूचना देखील डॉ.गोर्हे यांनी सीआयडी यांना केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पीडित कुटूंबियांनी निवेदन दिले आहे. यावेळी डॉ. गोर्हे यांनी घेतलेल्या पुढाकार आणि दिलेल्या धीरामुळे या कुटुंबीयांना मानसिक आधार मिळाला असून
त्यांनी आज नीलमताईच्या हस्ते जलप्राशन करून आपले उपोषण सोडले. या सर्व घटनेत पाठपुरावा करीत असलेले अहमदनगर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यावेळी उपस्थित होते.