नगर तालुक्यातील इमामपूर येथील अपहरण झालेल्या तरुणाचा खून झाल्याची घटना शुक्रवार दि. १५ रोजी उघडकीस आली आहे. अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणाचा अवघ्या २४ तासात तपास करून खुनाचा प्रकार उघडकीस आणण्यात एम.आय.डी.सी. पोलिसांना यश आले. तरुणाच्या खून प्रकरणाने इमामपूर गाव हादरले असून गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, इमामपूर गावातील हनुमंत दामोधर आवारे ( वय २७ ) याचे बुधवार दि. १३ रोजी घराजवळूनच अपहरण करण्यात आले होते. त्याबाबत हनुमंत आवारे याचा भाऊ कृष्णा दामोधर आवारे ( वय २४ रा. इमामपूर ) याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती.

गुरुवार दि. १४ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार हनुमंत हा बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास साईसेवा हॉटेल शेजारी असणाऱ्या जनावराच्या गोठ्यावर झोपण्यास गेला होता. त्यानंतर तो दिसला नाही तसेच घरी आला नाही. त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता मोबाईलही बंद होता.
त्यानंतर मित्राने फोनवरून माहिती दिली की बाळू भगत, शुभम आहेर यांनी हनुमंत याला उचलून नेऊन मारहाण केली आहे. त्यावरून बाळू छबू भगत ( रा.शेंडी ता. नगर ), शुभम भाऊसाहेब आहेर ( रा. वडगाव गुप्ता ता. नगर) व इतर दोन अनोळखी यांनी अपहरण करून हनुमान त्याला कोठेतरी सोडून दिल्याची फिर्याद दिली होती.
दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यामध्ये तपास करत असताना आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार हनुमान त्याला शेंडी शिवारात सोडून देण्यात आल्याचे सांगितले. परिसरात पोलिसांनी शोध घेतला असता हनुमंत यांचा मृतदेह आढळून आला.