७ जानेवारी २०२५ अकोले : प्रेम विवाहाच्या कारणातून एका तरूणाचे तरुणीच्या नातेवाईकांनी अपहरण केले. मात्र मित्राने तत्परता दाखवत ११२ ला फोन केल्याने पाऊण तासात पोलीस घटनास्थळी पोहचले आणि अपहृताला मारहाण करतांना पोलीसांनी आरोपीना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतल्याची घटना तालुक्यातील वाघापूर येथे घडली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या घटनेमुळे अहिल्यानगर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. ३१ डिसेंबरच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी तशा सूचना केल्या होत्या.त्यामुळे पोलीस यंत्रणा सजग झाली आहे.याचे प्रत्यंतर वाघापूर येथील अपहरण घटनेत आले.

अकोले तालुक्यातील वाघापूर या दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात संकेत लांडे याने गावातील आपल्या नात्यातील अस्मिता औटी हिच्याशी सहा महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केला. विवाह कायदेशीरही केला मात्र मुलीच्या कुटुंबीयांना ते खटकत होते.
विवाहानंतर संकेत व पत्नी अस्मिता दोन वेळा आपल्या घरी वाघापूर येथे आले. मात्र ४ जानेवारी रोजी दोघे पुन्हा गावी कुटूंबीयांना भेटण्यासाठी आले.सायंकाळी सात वाजता संकेत गावातील किराणा दुकान परिसरात उभा होता. अ
चानक अस्मिताचे आई वडील आणि नातेवाईक गोविंद औटी, पोपट औटी, रेखा औटी, रंजना औटी, बाळू औटी, श्रीकांत औटी यांनी तेथे येऊन संकेतला पकडून घेऊन गेले.संबंधित घटना संकेतच्या मित्राने पाहिली.त्याने पोलीस मदतीसाठी ११२ ला कॉल केला.
दरम्यान पत्नी अस्मिता, संकेतचा भाऊ आणि आई-वडील संकेतचा शोध घेत होते. दरम्यान संकेतच्या भावाच्या मोबाईलवर अस्मिताच्या आई वडील व कुटुंबातील सदस्यांचा फोन आला. तु आमच्याकडे ये नाहीतर संकेतला ठार मारु असे तिला धमकावले होते.