श्रीरामपूर शहरातुन दोन सख्या बहिणीचे अपहरण ; राहुरीत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : सध्या जिल्ह्यात अत्याचार, खून दरोडे, अल्पवयीन मुलीचे अपहरण या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. श्रीरामपूर शहरातील एका परिवारातल्या दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. तर राहुरी शहरातून एका ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तो फसला.

पहिली घटना श्रीरामपूर शहरातील एका परिवारातल्या दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलींच्या आईने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञाता विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, या दोन्ही मुली दुकानात जाऊन येतो असे सांगून बाहेर होत्या.बराच वेळ झाल्यानंतर देखील त्या परत घरी न आल्याने घरच्यांनी त्यांचा परिसरात शोध घेतला मात्र त्या आढळून आल्या नाहीत. यातील एक १७ वर्षाची व दुसरी १६ वर्षाची असल्याची माहिती मिळत आहे.दोघीही बहिणी-बहिणी आहेत.

दुसरी घटना राहुरी शहरातून सकाळच्या दरम्यान भर बाजार पेठेतून एका ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र काही तरुणांनी परप्रांतीय तरुणाला जागेवरच रंगेहाथ पकडल्याने पुढील अनर्थ टळला.

या घटनेतील मुलगी तिसरी इयत्तेत शिकत असून ती परिसरात तिच्या कुटुंबासह राहते. सकाळी ८ वाजे दरम्यान ती मुलगी तिचे वडील काम करत असलेल्या दुकानात पैसे आणण्यासाठी गेली होती. ती पुन्हा घरी जात असताना शहरातील भागीरथीबाई शाळा परिसरात रस्त्याने जात असताना एक परप्रांतीय तरुण तिला म्हणाला की माझ्या बरोबर चल, मी तुला तुझ्या आईकडे सोडतो.

तेव्हा त्या मुलीने नकार दिला असता, त्या परप्रांतीय तरुणाने त्या मुलीचा हात धरुन तिला जबरदस्तीने घेऊन जात होता. त्यावेळी त्या मुलीने आरडाओरडा केला. तेथे असलेल्या एका चहा दुकानासमोर शहरातील काही तरुण चहा पीत असताना सदर प्रकार त्यांनी पाहीला. त्यांनी सदर मुलीची चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार तरुणांना सांगीतला.

त्यावेळी तरुणांनी मुलीचे अपहरण करून घेऊन जात असलेल्या तरुणाला विचारले असता, त्याने मुका असल्याचे भासवून उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र संतप्त झालेल्या तरुणांनी त्या परप्रांतीय तरुणाची यथेच्छ धुलाई केली. तेव्हा तो बोलू लागला.

दरम्यान त्याने चार ते पाच वेळा मोठ्याने शिट्टी वाजवत आपल्या साथीदारांना इशारा दिला असे इतर तरुणांनी माहिती दिली . त्यानंतर तरुणांनी त्याला पकडून राहुरी पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले.

त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटिव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न केला. सदर तरुण कोणत्या राज्यातील आहे, त्याच्या बरोबर आणखी कोण कोण आहे. याचा तपास पोलीस करत होते. गणेशोत्सव सुरु असल्याने बाजारपेठेत प्रचंड गर्दी आहे. मात्र एवढ्या गर्दीच्या ठिकाणाहून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने पालक वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe