कुत्र्याच्या पिल्लाला मारणे पडले महागात; पिलाचा मृत्यू झाल्याने संतप्त मालकाने महिलेसोबत केले असे काही

Mahesh Waghmare
Updated:

Ahilyanagar News : कुत्र्याच्या पिल्लांना मारहाण करणे येथील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. कारण महिलेने पाळीव कुत्र्याच्या पिल्लांना काठीने मारून त्यातील एका पिल्लाला रस्त्यावर फेकून दिले. या घटनेत त्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना जुना बाजार येथील भिस्त गल्ली येथे १२ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या कुत्र्याच्या पिलाला मारहाण करणाऱ्या महिलेच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, भिस्तगल्ली येथे राहणारे सुलतान दुलेखा शेख यांनी गोल्डन रिट्रीबर जातीची कुत्री व तीन पिल्ले पाळलेली आहेत. त्यांना कुटुंबासह बाहेरगावी जायचे असल्याने त्यांनी कुत्री व पिल्ले त्यांच्या शेजारील सुमय्या मतीन शेख (वय ३३, रा. भिस्त गल्ली, जुना बाजार) यांना सांभाळावयास सांगितले.

सुमय्या यांनी १२ फेब्रुवारीला दुपारच्या वेळेस कुत्र्यांना खायला देवून घरासमोर फिरण्यासाठी सोडले. त्या घरात काम करत असताना त्यांना कुत्रे ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर जाऊन पाहिले असता शेजारील शाबा दुलेखा दारुवाले ही महिला काठीने कुत्र्याच्या पिल्लांना मारत होती.

यावेळी सुमय्या यांनी पिल्लांना का मारतेस त्यांनी तुझे काय बिघडवले असे म्हटल्याने त्याचा राग येऊन शाबा दारुवाले यांनी याबाबत तु जर पोलीस केस केली तर तुझ्या मुलांनाही असेच मारेल, असे म्हणून कुत्र्याचे पिल्लू रस्त्यावर फेकले. सुमय्या शेख यांनी तेथे जाऊन पाहिले असता कुत्र्याचे पिल्लू मेले होते. याप्रकरणी सुमय्या शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी शाबा दारूवाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe