अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- महिलांचे सक्षमीकरण व्हावे, महिलांनी स्वत:च्या पायावर कुटीर उद्योग सुरू करावेत. त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागावा, याउद्दात हेतूने राज्य सरकार महिला बचत गट स्थापन करून त्यांना बिगरव्याजी कर्ज देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करते.
अगदी तशाच प्रकारे मायक्रो फायनान्स कंपन्यानी देखील महिलांचे बचतगट स्थापन करून त्यांना कर्जपुरवठा केला. मात्र, या खासगी कंपनीच्या माध्यमातून आता महिलांना मानसिक त्रास देण्याचे काम सुरू झाले असून,

काही महिलांना विविध प्रकारचे प्रलोभनेदेखील दाखवण्याचे काम या कंपनीच्या एजंटकडून होत असल्याची लेखी तक्रार पाथर्डी तालुक्यातील महिलांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मायक्रो फायनान्स कंपनीचे लोक आमच्या घरी आले, तुम्ही बचत गटांप्रमाणे आमच्या कंपनीचे कर्ज घेऊ शकता व हप्ताही त्याप्रमाणे भरू शकता, असे सांगितले.
आम्ही त्यांच्याकडून कर्ज घेतले व कर्ज सुरळीतपणे फेडण्याचा प्रयत्न केला ;परंतू घेतलेल्या कर्जाचे व्याज अधिक त्यातच कोरोनाची साथ आल्यामुळे आम्हाला या फायनान्स कंपनीचे कर्ज फेडणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला मानसिक त्रास देऊन आमची पिळवणूक करण्याचा प्रयत्न होत आहे.
कर्ज फेडण्यासाठी आम्हाला काही प्रलोभनेदेखील दाखवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही रेग्युलर कर्ज फेडा, आम्ही तुम्हाला वाढीव कर्ज देऊ, असे आश्वासन दिले. या कंपनीच्या लोकांनी घरी येऊन आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
या कंपन्यावर शासनाचा वचक नाही, वसुलीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र नसते, या मनमानी पद्धतीला आळा घालण्यात यावा व ग्रामीण भागातील महिलांची होणारी आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम