अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- कोपरगावची लोकसंख्या वाढत आहे. त्यातुलनेत कोपरगावातील ग्रामीण रुग्णालयामध्ये केवळ 30 खाटांची सुविधा होती.
त्यामुळे वैद्यकीय सेवा देण्यास मर्यादा येत होत्या. यामुळे श्रीरामपूर पाठोपाठ जिल्ह्यातील कोपरगाव येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवाढ करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे कोपरगावकरांना आता अधिक प्रमाणात आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात रुग्ण अधिक आणि आरोग्य सुविधा तोकड्या यामुळे अनेक रुग्ण आणि नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
येथे खाटा रिकाम्या नसल्याने अनेकांना जिल्हा रुग्णालय अथवा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता. त्यात आर्थिक फटका सहन करावा लागत होता. तसेच रुग्ण आणि नातेवाईकांचे यात हाल होत होते.
याची दखल घेऊन आ. आशुतोष काळे आणि माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने या आरोग्य केंद्राला श्रेणीवाढ मिळाली आहे.
त्यामुळे कोपरगावकरांना दिलासा मिळाला आहे.100 खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयासाठी विहित पध्दतीने जागा अधिग्रहीत करून बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम