कोपरगावच्या विजेचा प्रश्न मार्गी! २.६८ कोटींचा निधी मंजूर; शेतकऱ्यांना दिलासा

Published on -

कोपरगाव मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांच्या मागणीनुसार वीजपुरवठा सुधारण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक विकास निधीअंतर्गत २.६८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, त्याअंतर्गत नवीन वीज रोहित्र बसविणे, वीज वाहिन्यांचे स्थलांतर, तसेच नवीन पोल टाकण्याची कामे केली जाणार आहेत. या निर्णयामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

तालुक्यातील चासनळी, पोहेगाव, बक्तरपूर, भोजडे, मढी बुद्रक, मुर्शतपूर, वारी, सोनेवाडी, टाकळी, देर्डे चांदवड, धोत्रे, वेळापूर, करंजी, कसली, कोकमठाण, खिर्डी गणेश, चांदगव्हाण, धामोरी, मायगाव देवी, माहेगाव देशमुख आणि संवत्सर या गावांमध्ये नवीन वीज रोहित्र बसवण्यात येणार आहेत.

या प्रकल्पांतर्गत काही गावांमध्ये वीज वाहिन्यांचे स्थलांतर करण्यात येणार असून, काही भागांत नवीन पोल टाकण्याची कामे केली जाणार आहेत. विशेषतः रामवाडी-भीमवाडी, दशरथवाडी, सडे, हिंगणी, अंचलगाव, शहाजापूर, येसगाव, पुणतांबा, नपावाडी, जळगाव आणि चितळी येथे ही कामे केली जाणार आहेत. या ठिकाणी वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी नवे पोल उभारले जातील.

मतदारसंघातील वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी चासनळी, सुरेगाव आणि पोहेगाव येथील सबस्टेशन शहा येथील १३२ केव्ही उपकेंद्राला जोडली जाणार आहेत. याशिवाय दहा गावांसाठी सौरऊर्जा सबस्टेशनला मंजुरी मिळाली आहे. या पायाभूत सुविधांमुळे कोपरगाव मतदारसंघातील विजेची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.

या निर्णयामुळे शेतकरी, व्यावसायिक आणि घरगुती वीज ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येणार असून, शेती आणि औद्योगिक क्षेत्राला या सुधारित वीजपुरवठ्याचा लाभ होणार आहे. मतदारसंघात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe