अकोले- तालुक्यातील धामणगाव आवारी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घोरपडवाडी शिवारातील शेतकरी चंद्रभान रामभाऊ गावंडे यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा सातबारा उताऱ्यावरून अचानक गायब झाला आहे.
स्वतःच्या नावावर असलेल्या जमिनीचा कोणताही ठावठिकाणा न सापडल्याने गावंडे यांनी महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. गावंडे यांच्या मालकीची सर्वे नंबर १३, गट क्रमांक २/१ ही जमीन त्यांच्या कुटुंबाचा उपजीविकेचा मुख्य आधार आहे. हीच जमीन कसत ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

मात्र, नुकतेच सरकारी कामानिमित्त तलाठी कार्यालयात गेले असता, त्यांच्या नावावर ही जमीनच नाही, असे सांगण्यात आले. हे ऐकताच गावंडे यांना धक्का बसला. सातबाऱ्यावरून स्वतःच्या जमिनीचा उल्लेखच गायब झाल्याने त्यांनी या प्रकाराची चौकशी करण्यासाठी तहसीलदारांची भेट घेतली.
हा प्रकार लक्षात येताच गावंडे यांनी त्वरित अकोले तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्याकडे १० मार्च रोजी अर्ज दाखल केला. आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर आपले नाव पुन्हा नोंद व्हावे, अशी त्यांनी मागणी केली. ११ मार्च रोजी त्यांनी तहसीलदारांना प्रत्यक्ष भेटून योग्य कारवाईसाठी विनंती केली.
मात्र, यावर महसूल विभागाकडून अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या प्रकारामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून, गावकऱ्यांमध्येही चिंता वाढली आहे. सातबारा उताऱ्यावरून जमीनच गायब होणे हा गंभीर विषय असून, महसूल यंत्रणेतील त्रुटी किंवा कोणाच्या संगनमताने हा प्रकार घडला का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
गावंडे यांनी आपली जमीन परत मिळवण्यासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. हा संपूर्ण प्रकार केवळ गावंडे यांच्या बाबतीतच घडला आहे की अजूनही असे प्रकार घडले आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. महसूल विभाग याबाबत कोणती पावले उचलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.