Malpani Group : मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने शिर्डीत लेझर शोचे शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी उद्घाटन होणार आहे. या शोमध्ये जादुच्या प्रयोगासह इतरही उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
याबाबत पत्रकात मालपाणी उद्योग समूहाचे संचालक जय मालपाणी यांनी सांगितले, की लेझर शो रोज सायंकाळी सुर्यास्तानंतर साई तीर्थ थीम पार्कमध्ये निःशुल्क सादर होणार आहे.
लेझर शोमध्ये थ्री डी मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या शोमध्ये जादूचे प्रयोग, मणिपुरच्या कलाकारांची चित्तथरारक अॅक्रोबेट प्रात्याक्षिके आणि साई पालखी असे विविध कार्यक्रमदेखील सादर केले जातील.
लेझर शोचे उद्घाटन शुक्रवार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता साई तीर्थ थीम पार्कमध्ये होणार आहे. या उद्घाटनासाठी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सदाशिवराव लोखंडे उपस्थित राहणार आहेत.
देश- विदेशातील लाखो साईभक्त शिर्डीत येत असतात. साई दर्शनानंतर काय करावे ? हा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने १८ वर्षांपूर्वी शिर्डीत वेट एन जॉय वॉटर पार्कची निर्मिती करण्यात आली.
त्यानंतर २०१८ मध्ये देशातील पहिल्या साई तीर्थ या धार्मिक थीम पार्कची सुरुवात करण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांना देश- विदेशातून येणाऱ्या साईभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या दोन्ही प्रकल्पांच्या यशानंतर नव्याने तयार करण्यात आलेल्या लेझर शोचे उद्घाटन हे मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने केले जात आहे. निशुल्क असलेला हा शो साईभक्तांसाठी एक आकर्षण ठरणार आहे. लेझर शोच्या उद्घाटन सोहळ्यासाठी शुक्रवारी सायंकाळी उपस्थित राहण्याचे आवाहन मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.