अहिल्यानगरमध्ये स्व. अरूणकाका जगताप यांचा पुतळा उभा राहणार, व्यापारी संघटनांची मागणी

दिवंगत माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या श्रद्धांजली सभेत व्यापाऱ्यांनी त्यांच्या योगदानाचे स्मरण करत त्यांचा पुतळा शहरात उभारावा, अशी मागणी केली. व्यापारी वर्गासाठी त्यांनी दिलेले सहकार्य सर्वांनी भावुकतेने आठवले.

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहराचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनाने व्यापारी वर्गावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या जाण्याने जणू एक आधारवड हरपला आहे. त्यांचा सातत्याने मिळणारा सहकार्याचा हात आणि दिलखुलास स्वभाव यामुळे व्यापारी वर्गात त्यांच्याबद्दल विशेष आदर होता. 

या दुःखद प्रसंगी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती जपण्यासाठी अहिल्यानगरातील व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन शोकसभा घेतली. यावेळी अरुणकाकांचा पुतळा शहरात उभारावा, अशी मागणी जोर धरली.

आठवणींना उजाळा

मार्केटयार्ड येथील हनुमान मंदिरात झालेल्या या शोकसभेला व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने हजर होते. अरुणकाकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. आमदार संग्राम जगताप यांचेही यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांनी सांत्वन केले. सभेत बोलणाऱ्या प्रत्येकाने अरुणकाकांच्या कार्याचा आणि त्यांच्या साध्या पण प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले.

अनिल पोखरणा यांनी सांगितले की, अरुणकाकांच्या निधनाने व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी नेहमीच व्यापाऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घेतला. श्रीगोपाल धूत यांनी अरुणकाकांच्या सर्व क्षेत्रांवरील प्रभावाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “रामकृष्ण शाळेच्या उभारणीत त्यांनी मोलाची मदत केली. त्यांचा प्रत्येक क्षेत्रात दबदबा होता.” डॉ. विजय भंडारी यांनी आपल्या बालपणीच्या मित्राला गमावल्याचे दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, “अरुणकाका कमी शिकलेले असले, तरी त्यांनी गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या माध्यमातून शेकडो डॉक्टर्स घडवले. त्यांचा हा वारसा कायम प्रेरणादायी राहील.”

लाखांचा पोशिंदा

सुमतीलाल कोठारी यांनी अरुणकाकांच्या साधेपणाचा आणि नम्रतेचा गौरव केला. ते म्हणाले, “राजकीय वारसा नसतानाही त्यांनी जिल्ह्यावर अधिराज्य गाजवले. पण कधीही त्याचा गर्व केला नाही. व्यापारी वर्गाला त्यांनी नेहमीच साथ दिली.” हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी अरुणकाकांना ‘लाखांचा पोशिंदा’ संबोधत त्यांच्या विशाल हृदयाचा आणि प्रेरणादायी विचारांचा उल्लेख केला. त्यांनी ठामपणे सांगितले की, अरुणकाकांचा पुतळा शहरात उभारलाच पाहिजे, जेणेकरून त्यांचे कार्य पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचेल.

कधीही द्वेषाचे राजकारण नाही

गणेश भोसले यांनी अरुणकाकांच्या प्रेमळ आणि जिव्हाळ्याच्या स्वभावाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “त्यांनी प्रत्येक व्यापाऱ्याला आपुलकीने वागवले. दिलेला शब्द पाळण्याची त्यांची खासियत होती. राजकारणातही त्यांनी अनेकांना संधी दिली, पण कधीही द्वेषाचे राजकारण केले नाही.” राजेंद्र बोथरा यांनी अरुणकाकांच्या हसतमुख आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या स्वभावाचे कौतुक केले. ते म्हणाले, “त्यांचा सुसंस्कृत आणि मैत्रीपूर्ण व्यवहार यामुळे प्रत्येकजण त्यांच्याकडे आकर्षित होत असे.”

शोकसभेचे प्रास्ताविक राजू शेटिया यांनी केले. यावेळी आडते बाजार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक गांधी, विजय मोहोळ, दामोदर भोसले, मर्चेंट बँकेचे संचालक संजय बोरा, संजय चोपडा, विजय कोथिंबिरे, विपुल शहा, प्रकाश भागानगरे, आदेश चंगेडिया, ज्ञानेश्वर रासकर, गणेश कोठारी, विशाल पवार, गोपाल मणियार, संजय पिपाडा, दिलीप कोकाण, सोनी मंडलेचा, छबुराव हराळ, राम मॅधानी यांच्यासह अनेकांनी अरुणकाकांसोबतच्या आठवणी सांगितल्या. सभेचे सूत्रसंचालन संतोष बोरा यांनी केले, तर विशाल पवार यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News