१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्याचा वावर वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळबंली असून शेतात जाण्यास कोणीही धजावत नाहीत. त्यामुळे पिकांची नासाडी होत आहे.पारनेर तालुक्यातील देसवडे, मांडवे, खडकवाडी, टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, पोखरी, या गावांमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, या मोकाट बिबट्यांना तत्काळ जेरबंद करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून हे बिबटे पाळीव प्राण्यांसह माणसांवर हल्ले करत आहेत. नुकतेच खडकवाडी येथे चिमुकल्या मुलीवर बिबट्याने हल्ला करत तीचा बळी घेतला तसेच देसवडे येथेही योगेश गोळे या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले आहे. बिबट्यांच्या या हल्ल्याने परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-50.jpg)
रात्री-अपरात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाताना शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. देसवडे व परिसर व इतर गावांत अनेक बिबटयांचा वावर आहे. काही शेतकऱ्यांना अक्षरश: टोळीने चार ते पाच बिबटे फिरताना दिसले आहेत.बिबट्यांच्या भीतीने शेतातील उभी पिके सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बिबट्यांचा वावर पाहता हल्ले वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्यात यावे अन्यथा शेतकऱ्यांसह आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनातून पारनेर तालुक्यातील अतिसंवेदनशील गावांना संभाव्य बिबट आपत्तीप्रवण क्षेत्र घोषित करावे, बिबट्यांची वाढती संख्या पाहता बिबट नसबंदी करण्यात यावी, बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या माणसांना १० लाख रुपयांची मदत मिळावी व स्वसंरक्षणासाठी बिबट्यांना मारण्याची परवानगी देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.