केडगावमध्ये भर वस्तीत बिबट्याचा हैदोस, दोघांवर हल्ले

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील येथील केडगाव परिसरात आज शनिवारी सकाळपासून बिबट्याने धुडगूस घातला आहे.

सुमारे तीन तासांपासून त्याला पकडण्यासाठी नागरिक आणि वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले आहेत.

राधेशाम कॉलनी परिसरात सकाळी तो काही लोकांना दिसताच त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

त्यामुळे केडगावसह शहरात सर्वत्र ही माहिती पसरली. तो पर्यंत बिबट्याने केडगावमध्ये हिंस्त्र रूप धारण केले होते.

रस्त्याने जाणारे, त्याला पहायला आलेले, त्याच्या मागे पळणारे यांच्यापासून बचावासाठी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न बिबट्याने केला. त्यात दोघे जखमी झाले आहेत.

अंबिकानगर परिसरात एका मोटारसायकल स्वारावर त्याने झडप घातल्याने त्यात विजय चव्हाण व अरुण चव्हाण हे गंभीर जखमी झाले.

दोन जखमींपैकी एकाला पाठीवर व पोटावर नखे लागली आहेत, तर दुसर्‍याला डोक्याला चावा घेण्याचा प्रयत्न केल्याने ते गंभीर जखमी झाले. जवळपास चार तास बिबट्या पुढे आणि नागरिक मागे असा खेळ सुरू होता.

दरम्यान, बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वनविभागाला तातडीने याची माहिती देण्यात आली. ते येईपर्यंत बिबट्या परिसरातील विविध बंगल्यांच्या आवारात, झाडा झुडपात, चारचाकी वाहनांच्या मागे,

कंपाऊंड वॉलच्या मागे अशी जेथे जागा मिळेल तेथे आश्रय घेत होता. प्रत्यक्ष फिरताना अनेकांनी त्याला पाहिले असून, एवढा मोठा बिबट्या यापूर्वी कधी पाहिला नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वनविभागाला तातडीने माहिती देण्यात आली. पक्षी, निसर्ग मित्र मंदार साबळे यांनीही वनविभागाच्या पथकाला याची माहिती दिली.

मात्र केडगाव, अंबिकानगर भागातील नागरिकांनी वनविभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. कर्मचारी उशीरा आले,

येताना त्यांच्याकडे पूरती साधनसामग्री नव्हती, बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठीचे इंजेक्शन देखील त्यांच्याकडे पुरेसे उपलब्ध नव्हते, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe