१८ फेब्रुवारी २०२५ राहुरी : तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांवर बिबट्यांचे हल्ले वाढल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचे गंभीर आरोप झाले आहेत. भगवा ग्रुपचे महाराष्ट्र अध्यक्ष निलेश जगधने यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.
जगधने यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात बिबट्याचे हल्ले वाढले असून, त्यात दोन लहान बालकांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढत असताना वनविभागाच्या पथकाकडून रात्री गस्त घालण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

तसेच अनेक ठिकाणी झाडांची अनधिकृत तोड सुरू असून, स्थानिक आरे गिरण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे.यामध्ये वनक्षेत्रपालांचा आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी निलेश जगधने यांनी थेट वनमंत्री गणेश नाईक यांच्या पीएशी संपर्क साधत राहुरी तालुक्यातील वनविभागातील सावळा गोंधळाबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच अधिकारी आणि वृक्षतोड करणाऱ्या वखार मालकांमधील संबंधांबाबत चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.