अहिल्यानगर शहरात घुसला बिबट्या सीनानदी लगत आढळले बिबट्याच्या पावलांचे ठसे

Published on -

अहिल्यानगर : नगर शहराजवळील आयुर्वेद कॉर्नर ते काटवन खंडोबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीनानदीच्या पुलाखाली २२ जानेवारीला रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास काही युवकांना बिबट्या दिसला.

त्यानंतर २४ जानेवारी रोजी दुपारी वनविभागाच्या पथकाने या परिसरात पाहणी केली असता सीना नदी लगतच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले.

याबाबत वरिष्ठांना अहवाल देत बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात पिंजरा लावणार असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.

सीनानदी पुलाखाली बिबट्या दिसल्याने काटवन खंडोबा तसेच सीना नदी लगत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. २३ जानेवारीला सकाळी वनविभागाने केलेल्या पाहणीत बिबट्याचे ठसे दिसून आले नव्हते. मात्र माजी नगरसेवक दत्ता जाधव यांनी २४ जानेवारीला

सकाळी पुन्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत या परिसरात पुन्हा पाहणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार दुपारी जाधव यांच्यासह वनपाल नितीन गायकवाड, वैभव गाढवे,

वनरक्षक बाळासाहेब रणसिंग, वन्यजीव अभ्यासक हर्षद कटारिया, सोनल करपे, जाकीर शेख, निलेश गाडळकर, इरफान सय्यद, शेरकर आदीसह परिसरातील नागरिकांनी सीनानदीलगत असलेल्या परिसरात फिरून पाहणी केली. यावेळी शेतात बिबट्याचे ठसे आढळून आले.

नागरिकांनी सतर्क रहावे

सध्या उस तोड सुरु असल्याने बिबट्याचे क्षेत्र कमी होत असल्याने बिबटे भक्षाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहणे आवश्यक आहे.

बिबटे सायंकाळनंतर बाहेर पडतात. नागरिकांनी लहान मुलांना सायंकाळनंतर घराबाहेर पडू देवू नये. शेतात जाणाऱ्यांनी एकट्याने न जाता एखादा जोडीदार
बरोबर न्यावा.

जवळ काठी बाळगावी, मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावावीत, टॉर्चचा वापर करावा, असे आवाहन हर्षद कटारिया यांनी केले.

वन विभागाने उपाय करावेत जाधव सीना नदी लगतच्या परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने या भागात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दत्ता जाधव यांनी केली

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe