Ahilyanagar News: नगर तालुक्यातील जेऊर येथील शेतकरी बाळासाहेब लक्ष्मण शिंदे यांच्या शेळीची रविवारी बिबट्याकडून शिकार करण्यात आल्याची घटना घडली आहे. तालुक्यात पशुधनाच्या शिकारीच्या घटना सुरूच असल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंता निर्माण झाली असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर शिवारातील डोंगरगण रस्त्यालगत राहत असणाऱ्या बाळासाहेब शिंदे यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळीची शिकार बिबट्याकडून करण्यात आली आहे.परिसरातील नागरिकांनी आरडा ओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांच्या संख्येत वाढ होत असून पशुधनाच्या शिकारीही मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत.

चास,अकोळनेर, जेऊर, चांदबिबी महाल परिसर, सारोळा कासार, निमगाव घाणा, आगडगाव, बहिरवाडी, इमामपूर, ससेवाडी, हिंगणगाव पट्ट्यात बिबट्यांकडून आजवर अनेक पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडलेल्या आहेत. बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाकडून ठोस पावले उचलण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वर्षभरात सुमारे ४०० पशुधनाच्या शिकारीच्या घटना तालुक्यात घडलेल्या आहेत.बिबट्या वनविभागाच्या अनुसूची क्रमांक एक मध्ये येत असल्याने त्याच्या संरक्षणासाठी कडक कायदे करण्यात आलेले आहेत.बिबट्यांचा वावर मानवी वस्तीत देखील आढळून आलेला आहे. त्यामुळे बिबट्याच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
बिबट्याला पकडण्यासाठी अथवा पिंजरा लावण्यासाठी कडक नियमावली बनवण्यात आली आहे. त्यामुळे वन विभागावरही मर्यादा येत आहेत.परंतु तालुक्यातील बिबट्यांचा वाढता वावर व पशुधनांच्या होणाऱ्या शिकारी यामुळे बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकडून ठोस निर्णय घेण्याची मागणी होत आहे. बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी वर्गामध्ये तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही खासदार व आमदारांकडून बिबट्यांच्या नसबंदी बाबतचा प्रस्ताव तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसून त्याबाबत सरकार काय भूमिका घेते याची नागरिकांना प्रतीक्षा आहे. तालुक्यात वन विभागाच्या वतीने बिबट्या पासून संरक्षण करण्याबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
तालुक्यात गर्भगिरीच्या मोठ्या प्रमाणात डोंगर रांगा विखुरलेल्या आहेत.डोंगर रांगांनी वन्य प्राण्यांचा मुक्त संचार आढळतो.त्यामुळे लपण व खाद्य सहज उपलब्ध होत असल्याने तालुक्याकडे बिबटे आकर्षित होत आहेत.जेऊर परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडलेल्या आहेत.वारंवार जेऊर परिसरात बिबट्याचे दर्शन घडत असल्याने येथील नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे.