१२ फेब्रुवारी २०२५ आश्वी : संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या काल मध्यरात्री जेरबंद झाला.त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील आठवड्यात गुरुवारी सायंकाळी संकल्प अर्जुन आंधळे आणि सुनील बबन आंधळे यांच्यावर सर्जेराव नाना आंधळे यांच्या वस्तीनजीक बिबट्या हल्ला करण्याच्या हेतूने चालून आला होता.
मात्र दोघांनी यावेळी प्रसंगावधान राखत जोरात आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली होती.या परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा,अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती.या मागणीची दखल घेऊन सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास वनविभागाने हिराबाई रंभाजी इलग यांच्या गट नंबर ३५०/३ मध्ये पिंजरा लावला होता.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-2025-02-12T121631.318.jpg)
मध्यरात्री बिबट्या अलगद पिंजऱ्यात अडकल्यानंतर सकाळी वनविभागाने या बिबट्याला निबांळे येथील रोपवाटिकेत हलवले.दरम्यान, याच परिसरात नर आणि मादी बिबट्यासह तीन ते चार पिल्लांचा वावर देखील नियमितपणे पहावयास मिळत असल्याचे स्थानिकाचे म्हणने आहे. त्यामुळे या परिसरात आणखी पिंजरे लावून बिबट्याचे व त्याचे पूर्ण कुटूंब जेरबंद करुन नागरीकांची दहशतीतून मुक्तता करावी,अशी मागणी ज्येष्ठ नेते भगवानराव इलग, शिवाजी इलग आदींनी केली आहे.