Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, पोहेगाव परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली असून या बिबट्याने पंचकेश्वर शिवारातील नवनाथ देवराम गुडघे यांच्या पाळीव कुत्र्याची नुकतीच शिकार केली.
परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे वनविभागाने सोयीस्कर गोड बोलून दुर्लक्ष न करता या परिसरात तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी येथील सोनेवाडी विकास सोसायटीचे संचालक निरंजन गुडघे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
सोनेवाडी परिसरात या बिबट्याने गेल्या तीन महिन्यापासून आपला मोर्चा वळवला असून या बिबट्याची संख्या जवळपास दोन ते तीन असल्याची अनेकांनी माहिती सांगितली. पंचकेश्वर शिवारात नवनाथ गुडघे हे आपल्या शेतात वस्ती करून राहतात.
काल मंगळवारी रात्री जनावराचे चारा पाण्याचे काम आटपून ते रात्री दहा वाजता घरात घुसले असता, दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार केली.
शिकार होत असता दुसरे कुत्रे जोरदार भुंकत असल्याचा आवाज त्यांना आला असता, त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता डोळ्यासमोरच बिबट्याने पाळीव कुत्रे चालवल्याचे त्यांच्या लक्षात आले. समोर बिबट्या असल्याने त्यांना काय करावे काही सुचले नाही. मात्र फटाके वाजवत या बिबट्याला तिथून पिटाळून लावले.
आसपास राहत असलेल्या वाढीवस्त्यावर त्यांनी भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. तेव्हा तेथील नागरिकांनी रात्र जागून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी सोनेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी भानुदास दाभाडे यांना याबाबत त्यांनी कल्पना दिली असता
निरंजन गुडघे, सरपंच शकुंतला गुडघे, उपसरपंच संजय गुडघे, ग्रामपंचायतीचे सदस्य आबासाहेब जावळे, चिलु जावळे यांनी बिबट्याच्या या दहशतीमुळे वाड्या रस्त्यावरील नागरिकांनी सावधान राहावे, असे आवाहन केले.
तर वनविभागाने तातडीने या परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावा, अशी मागणी निरंजन गुडघे यांनी वनविभागाकडे केली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वन विभागाला हा बिबट्या जेरबंद करण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, वनविभागाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचे नवनाथ गुडघे यांनी सांगितले आहे.