आगडगाव व रांजणीतील ग्रामस्थांना वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे धडे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- ग्रामीण विकासामध्ये स्वच्छता हा कुटुंबाचा व गावचा आत्मा आहे. गावातील प्रत्येक नागरिकाने आपले गाव व कुटुंब स्वच्छ ठेवणे कर्तव्ये व जबाबदारी आहे.

त्यामुळे प्रत्येकाने गाव स्वच्छ ठेवून गावाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी शौचालय उभारुन नयमितपणे त्याचा वापर करणे, सार्वजनिक परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी शीलकुमार जगताप यांनी केले.

ग्रामीण स्वच्छतेस प्रोत्साहन देऊन लोकांचा स्वच्छ भारत अभियानात सहभाग वाढवून हे अभियान यशस्वी करणे व गावाचे आरोग्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅण्ड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड)

व बॉस्को ग्रामीण विकास केंद्र केडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नगर तालुक्यातील आगडगाव व रांजणी येथे एक दिवसीय ग्रामीण स्वच्छता जनजागृती अभियान कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी जगताप बोलत होते. या कार्यशाळे जिल्हा अग्रिनी बँकेचे जिल्हा प्रबंधक संदीप वालावलकर, प्राथमिक आरोग्य केंद्र

देवगावचे डॉ. मोरे, आत्मा (अ‍ॅग्रीकल्चर टेक्नोलॉजी मॅनेजमेंट एजन्सी) डोईफोडे व बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज डीअ‍ॅब्रिओ यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून मार्गदर्शन केले.

जनतेमध्ये स्वच्छतेच्या सवयी निर्माण होऊन, ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुधारावे या उदेशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जेणे करून जी कुटुंबे स्वच्छ भारत अभियानापासून वंचित राहिलेली आहेत, ज्यांनी अद्याप शौचालय बांधलेले नाहीत,

बांधले असले तरी पाणी व इतर कारणासाठी वापर करत नाहीत, अशा कुटुंबांना या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रोत्साहित करुन हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले.

या कार्यशाळेत गावातील प्राधान्यक्रमे निवडलेल्या 135 वंचित कुटुंबांनी सहभाग घेतला. नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी जगताप यांनी नाबार्डच्या विविध विकास योजनांची माहिती दिली. जिल्हा अग्रिनी बँकेचे जिल्हा प्रबंधक संदीप वालावलकर यांनी शेतकरी व सामान्य जनतेसाठी उपलब्ध असलेल्या बँकाच्या विविध योजनांची माहिती दिली.

प्राथमिक आरोग्य केंद्र देवगावचे डॉ. मोरे यांनी निरोगी आरोग्यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सांगितले.

बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज डीअ‍ॅब्रिओ यांनी नाबार्डच्या माध्यामातून पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रमामुळे गावातील शेती व उपजीविका संदर्भात झालेल्या कामामुळे सामाजिक व आर्थिक विकास साधला गेला.

सध्या सुरु असलेल्या ग्रामीण स्वच्छता अभियानातून नक्कीच गाव स्वच्छ व आरोग्यदायी होईल अशी आशा व्यक्त केली व ही मोहीम यशस्वी करण्यास ग्रामस्थांना पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

या कार्यशाळेसाठी आगडगावचे सरपंच मच्छिद्र कराळे, उपसरपंच किसन शिरसाठ, रांजणीचे सरपंच बाळासाहेब चेमटे, उपसरपंच विजय लिपने, रांजणी सोसायटीचे व्हाईस चेअरमन अशोक लिपने व दोन्ही गावातीआल ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे दिनेश शेरकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे कर्मचारी व गावातील ग्रामस्थांनी केले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment