शिर्डी साई संस्थानचे सभासद करुन देऊ.. ‘या’ माजी आमदाराकडून उकळलले पैसे, धक्कादायक प्रकार

Published on -

शिर्डीतील साईबाबांचे देशभर भक्त आहेत. साई संस्थान सर्वात मोठे संस्थान आहे. या संस्थानचे सभासद करून घेण्याचे आमिष दाखवत माजी आमदारांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील माजी आमदार जोगिंदर सिंह गिरवर सिंह अवाना असे या माजी आमदारांचे नाव असून यांची शिर्डीत अमोल गुजराथी नावाच्या व्यक्तीने फसवणूक केली आहे.

अवाना हे साईबाबांचे निःस्सीम भक्त असून दरवर्षी ते दर्शनासाठी शिर्डीत येतात. त्यांना राजस्थानच्या एका संघटनेचे प्रतिनिधी म्हणून काहीकाळ कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा होता. अमोल गुजराथी या व्यक्तीने त्यांना साईबाबा संस्थानचे सभासद होण्याचे आमिष दाखवले आणि त्यासाठी ६००० रुपये घेतले.काही दिवसांपूर्वी त्यांची नवनाथ घुले यांच्यामार्फत अमोल गुजराथी याच्याबरोबर ओळख झाली होती.

काही दिवसांपूर्वी गुजराथीने अवाना यांना व्हॉट्सपवर मेसेज करून साईबाबा संस्थानचे सभासद होण्याचा प्रस्ताव दिला. यामुळे व्हीआयपी दर्शनाची सुविधा व दर्शनासाठी प्रोटोकॉल मिळेल, प्रत्येक राज्यातून एका सदस्याची निवड होणार असल्याचे त्याने सांगितले. अवाना यांनी होकार दिल्यावर गुजराथीने त्यांना एक फॉर्म आणि प्रति सभासद ३००० रुपये भरण्यास सांगितले.

अवाना यांनी त्यांचा मुलगा हिमांशू चौधरी यांच्या नावे फॉर्म भरून आधार कार्डासह ६००० रुपये पेटीएमद्वारे पाठवले. पैसे दिल्यानंतर अवाना यांनी पावती मागितली, परंतू गुजराथीने टाळाटाळ केली. नंतर गुजराथीचा फोन बंद झाला आणि संपर्क तुटला. काल शिर्डीत आल्यावर अवाना यांनी संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांना हा प्रकार सांगितला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe