Ahmednagar News : खूनप्रकरणी नऊ आरोपींना जन्मठेप ! मयताच्या कुटुंबाला दीड लाख देण्याचे आदेश

Published on -

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील लोहगाव येथे शेतीच्या वादातून गौरव अनिल कडू यांचा डोक्यात कुदळ मारून खून करण्यात आला होता. याप्रकरणी कोपरगाव येथील सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी नऊ आरोपींना दोषी ठरवत, जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

त्याचबरोबर मयताच्या कुटुंबास दंड रकमेतून दीड लाख रुपये रोकड देण्याचे आदेश केले आहेत.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे लोहगाव (ता. राहाता) येथील सर्वे नं. ६० मधील शेतीच्या वादातून अमोल नेहे, किशोर नेहे, वसंत नेहे, सुरेश नेहे, सचिन नेहे, प्रसाद नेहे, आकाश नेहे, मयूर नेहे व जगन्नाथ पांडगळे या नऊ जणांनी गौरव अनिल कडू यांच्या डोक्यात कुदळ मारून व लोखंडी रॉडने मारहाण केली होती.

यात गौरव कडू गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी खूनाच्या आरोपाखाली वरील नऊ जणांविरूद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पूर्ण होऊन कोपरगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात वरील नऊ आरोपी विरुद्ध दोषारोप दाखल झाले होते.

सदर खटल्यामध्ये सरकार तर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शरद गुजर यांनी काम पाहिले. सदर प्रकरणात एकूण अकरा साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, शवविच्छेदन अहवालन, तपासी अधिकारी यांचे जबाब नोंदविण्यात आले.

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार याची साक्ष महत्वाची ठरली. सरकारी वकीलांनी त्यांच्या युक्तिवादात सर्व मुद्दे न्यायालयापुढे सिध्द केले. सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून कोपरगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एम.पाटील यांनी सर्व नऊ आरोपींना दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

तसेच एकूण एक लाख ८० हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंडाच्या रकमेपैकी मयताच्या कुटुंबास नुकसान भरपाई पोटी एक लाख ५० हजार रुपये देण्याचे आदेश करण्यात आले आहे. सदर प्रकरणात तपासी अधिकारी म्हणून लोणी पोलीस स्टेशनचे ए.एस.आय. नारायण माळी यांनी काम पाहिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News